CWG 2022 : भारताचा स्क्वॅश खेळाडू सौरव घोषालने पटकावले कांस्य
बर्मिंगहॅम; पुढारी ऑनलाईन : भारताचा स्क्वॅश खेळाडू सौरव घोषालने इंग्लंडच्या जेम्स विलस्ट्रॉपचा 3-0 असा एकतर्फी पराभव करत राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे (CWG 2022) कांस्यपदक पटकावले. हे या स्पर्धेतील स्क्वॅशमधील भारताचे पहिले पदक ठरले. घोषाल व विलस्ट्रॉप यांनी कांस्य पदकासाठी झालेल्या लढतीत सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ केला. मात्र, घोषालने आपल्या अनुभवाच्या बळावर विलस्ट्रॉपविरुद्धच्या पहिला गेम 11-6 असा जिंकला. दुसर्या गेममध्येही घोषाल 8-1 असा आघाडीवर होता. विलस्ट्रॉपला पूर्णपणे निष्प्रभ करत घोषालने हा गेम 11-1 असा जिंकून 2-0 अशी आघाडी घेतली. त्यानंतर तिसर्या गेममध्येही घोषालने आपले वर्चस्व कायम राखत हा गेम 11-4 असा जिंकून कांस्यपदक पटकावले.
22 व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या (CWG 2022) सहाव्या दिवशी भारताने 2 रौप्य व 2 कास्य अशी एकूण 4 पदके पटकावली. बॅडमिंटनमधील मिश्र सांघिक प्रकारात भारताने रौप्यपदक पटकावले. तसेच महिला ज्युडो खेळाडू तुलिना मानने रौप्यपदक जिंकले. वेटलिफ्टर लवप्रीत सिंगने 109 किलो वजनी गटात कांस्यपदक पटकावले. तसेच स्क्वॅशमध्ये सौरभ घोषालने कास्य पदकाला गवसणी घातली. तर, महिला बॉक्सर नीतू घनघसन व पुरुष बॉक्सर मोहम्मद हुसामुद्दिन यांनीही पदके निश्चित केली. भारतीय महिला व पुरूष हॉकी संघानेही सेमीफायनलध्ये धडक मारून पदकाच्या आशा पल्लवित केल्या. तर महिला बॉक्सिंगमध्ये निखत झरिननेही सेमीफायनलमध्ये धडक मारली.