कामाख्या कॉरिडॉरचा पंतप्रधानांच्या हस्ते प्रारंभ

कामाख्या कॉरिडॉरचा पंतप्रधानांच्या हस्ते प्रारंभ

Published on

गुवाहाटी, वृत्तसंस्था : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, कामाख्या मंदिर कॉरिडॉरसह आसाममधील 11 हजार कोटींवर खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन रविवारी केले. कामाख्या कॉरिडॉरवर 498 कोटी रुपये खर्च होणार आहेत. 51 शक्तिपीठांमध्ये कामाख्या मंदिराचा समावेश होतो. तांत्रिक शक्ती संप्रदायाचे हे केंद्र आहे. आपली मंदिरे ही आपल्या हजारो वर्षांच्या सांस्कृतिक प्रवासातील अभिमान बाळगावेत, असे मानबिंदू आहेत, असे पंतप्रधान यावेळी म्हणाले. जाहीर सभेपूर्वी पंतप्रधानांनी रोड शो केला. त्यांच्यासोबत मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमाही होते.

काशी, महाकालनंतर कामाख्या कॉरिडॉर..!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी माँ कामाख्या दिव्य लोक प्रकल्पांतर्गत देवी कामाख्या मंदिर कॉरिडॉरसह आसाममधील 11 हजार कोटींवर खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन केले. महाकाल व काशी विश्वनाथ कॉरिडॉरनंतर सुरू होत असलेल्या कामाख्या कॉरिडॉरवर 498 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.

कॉरिडॉरमध्ये मंदिरेच मंदिरे

कामाख्यासह निलांचल पर्वतावरील मातंगी, कमला, त्रिपुरा सुंदरी, काली, तारा, भुवनेश्वरी, बगलामुखी, छिन्नमस्ता, भैरवी, धुमावतीदेवी आणि दशमहाविद्या (देवतेचे दहा अवतार) ही मंदिरेही कॉरिडॉरचा एक भाग आहेत.
कामेश्वर, सिद्धेश्वर, केदारेश्वर, अमरटोकेश्वर, अघोरा आणि कौटिलिंग ही शंकराची 5 मंदिरे निलांचल टेकडीभोवती आहेत. तीही या कॉरिडॉरमध्ये असतील.
51 शक्तिपीठांमध्ये कामाख्यादेवीच्या मंदिराचा समावेश होतो. तिला कामेश्वरी किंवा इच्छेची देवी असेही म्हणतात. कामाख्येचे पीठ तांत्रिक शक्ती संप्रदायाचे केंद्र आहे.
ब्रह्मा, विष्णू आणि शिव यांनी बनवलेला निलांचल पर्वतवर ब्रह्मा टेकडी, विष्णू टेकडी आणि शिव टेकडी असे 3 भाग आहेत. भुवनेश्वरी मंदिर सर्वात उंचावर आहे.
टेकडीच्या उत्तरेकडे ब्रह्मपुत्रा नदी वाहते. निलांचल टेकडीवर बाणादुर्गा, जयादुर्गा, ललिता कांता, स्मरणकली, गदाधर, घंटाकर्ण, त्रिनाथ, शंखेश्वरी, द्वारपाल गणेश अशी आणखीही मंदिरे आहेत. बराहा टेकडीवर हनुमान मंदिर, पांडुनाथ मंदिर आहे.

मोदींनी स्पष्ट केला फरक;

* पूर्वी व आता पूर्वी आसाममध्ये 6 वैद्यकीय महाविद्यालये होती, आज 12 आहेत.
* पूर्वी ईशान्य दुर्लक्षित होता. आता चित्र पूर्णपणे बदलले आहे.
* पूर्वी कुणी इथे येत नव्हते. गेल्या 10 वर्षांत इथे विक्रमी संख्येने पर्यटक आले आहेत.
* 2014 पर्यंत ईशान्येत फक्त 10 हजार कि.मी.चे राष्ट्रीय महामार्ग होते. गेल्या 10 वर्षांत आम्ही 6 हजार कि.मी. नवीन राष्ट्रीय महामार्ग बांधले.

हे विकास प्रकल्प

पंतप्रधानांनी गुवाहाटी न्यू एअरपोर्ट टर्मिनलपासून 358 कोटी रुपयांच्या सहा लेन रोड प्रकल्पाचे, 831 कोटी रुपयांचे आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्टेडियम आणि 300 कोटी रुपयांच्या नवीन क्रीडा संकुलाच्या प्रकल्पाचे उद्घाटन केले.
रस्त्यांच्या दुसर्‍या टप्प्याचे 3,444 कोटी रुपये खर्चाचे कामही सुरू केले. गुवाहाटी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलच्या इमारतीची पायाभरणीही पंतप्रधान मोदींनी केली. हे हॉस्पिटल 3,250 कोटी रुपये खर्चून बांधले जाणार आहे.

पंतप्रधानांचा रोड शो

रविवारी जाहीर सभेपूर्वी पंतप्रधानांनी रोड शो केला. त्यांच्यासोबत मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमाही होते.

आपली मंदिरे, तीर्थक्षेत्रे हाच तर आपला वारसा! : मोदी

अयोध्येत 22 जानेवारीला श्रीरामलल्लाच्या अभिषेक सोहळ्यानंतर आज मी आई कामाख्येच्या दारात आलो आहे. रामलल्लाच्या अभिषेकानंतर माँ कामाख्या दिव्य लोक प्रकल्पाच्या पायाभरणीचे भाग्य माझ्या वाट्याला आले आहे, असे भावपूर्ण उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले. काही लोकांना स्वतःच्या संस्कृतीची लाज वाटते. मला अभिमान वाटतो. आपली तीर्थक्षेत्रे, आपली मंदिरे, आपली श्रद्धास्थाने याच तर आपल्या संस्कृतीच्या हजारो वर्षांच्या प्रवासाच्या पाऊलखुणा आहेत, असेही पंतप्रधान म्हणाले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news