पुण्याला येताय, मग ’या’ ठिकाणांना नक्की भेट द्या!

पुण्याला येताय, मग ’या’ ठिकाणांना नक्की भेट द्या!
Published on
Updated on

सुनील जगताप

पुणे : 'वाड्यांचे शहर' असणार्‍या पुण्याला जाण्याचा प्लॅन करीत असाल, तर तिथल्या 'या' प्रसिद्ध ठिकाणांना नक्की भेट दिली पाहिजे. 'विद्येचे माहेर घर' असणारे पुणे, महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणूनही ओळखले जाते. पुणे शहरात अनेक पर्यटनस्थळे आहेत. ज्यामुळे अनेक पर्यटक वीकेंडला पुण्याला फिरायला जाण्याचा बेत आखतात.

पुणे शहर मुंबई शहरापासून अगदीच जवळ असल्याने केवळ पुण्यातीलच नव्हे, तर मुंबईतील लोकही शनिवार आणि रविवार पुण्यातील पर्यटनस्थळांना भेट देण्याचा प्लॅन करतात. पुणे शहराला स्वतःची एक ओळख, संस्कृती आणि इतिहास आहे. 'वाड्यांचे शहर' असणार्‍या पुण्याला जाण्याचा प्लॅन करीत असाल, तर तिथल्या 'या' प्रसिद्ध ठिकाणांना नक्की भेट दिली पाहिजे.

शनिवार वाडा

शनिवार वाडा म्हणजे पुणे शहरातील जगप्रसिद्ध ऐतिहासिक वास्तू. शनिवार वाडा हा पेशवेकाळात बांधण्यात आला होता. याच ठिकाणी पेशव्यांचे निवासस्थान होते. पहिले बाजीराव पेशवा यांनी सन 1736 मध्ये या जागी लाकडी राजवाडा बांधला होता. मात्र, इंग्रजांनी हा वाडा नष्ट केला. आता केवळ वाड्याचा पाया येथे शिल्लक आहे. हा वाडा पाहताना एक ऐतिहासिक वास्तू पाहण्याचा आनंद तुम्हाला नक्कीच मिळू शकतो. प्रवेशासाठी नाममात्र शुल्क आहे.

पर्वती

पर्वती ही महाराष्ट्रातील पुणे शहराच्या आग्नेेय दिशेस उभी असलेली टेकडी आहे. पर्वताई देवीच्या नावावरून टेकडीस पर्वती हे नाव पडले. पुण्याच्या अनेक भागांतून ती द़ृष्टीस पडते. सुमारे 103 पायर्‍या चढून येथे पोहोचता येते. या पायर्‍या भव्य अशा नौबतखान्याजवळ संपतात. या टेकडीच्या माथ्यावर देवदेवेश्वर मंदिर व अन्य काही देवदेवतांची मंदिरे आहेत.

दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर

प्लेगच्या साथीने आपला एकुलता एक मुलगा गमावल्यानंतर श्री गणेशाचे 'दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर' श्री दगडूशेठ हलवाई आणि त्यांची पत्नी लक्ष्मीबाई यांनी बांधले. नंतरच्या काळात लोकमान्य टिळकांनी लोकांना स्वातंत्र्यलढ्यात एकत्र आणण्यासाठी गणपती उत्सव सार्वजनिक उत्सव म्हणून साजरा केला. दर वर्षी लाखो पर्यटक या मंदिराला भेट देतात.

लाल महल

पुणे शहराच्या मध्यभागी असलेला लाल महल पुण्यातील ऐतिहासिक वास्तूंपैकी एक आहे. लाल महलमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे वास्तव्य होते. पुण्यात आल्यावर शिवाजी महाराजांचे बालपण याच वास्तूत गेले. स्वराज्य हिसकावू पाहणार्‍या शाहिस्तेखानाची बोटेदेखील शिवाजी महाराजांनी याच महलात छाटली होती. आता पुणे महापालिकेने लाल महलची पुनर्बांधणी केली आहे. त्यामुळे आताची वास्तू एक प्रेक्षणीय स्थळ म्हणून नक्कीच पाहण्यासारखी आहे.

ओकायामा फ्रेंडशिप गार्डन

पुण्यातील पु. ल. देशपांडे या सुप्रसिद्ध गार्डनचे पूर्वीचे नाव 'ओकायामा फ्रेंडशिप गार्डन' असे होते. पुण्यातील सिंहगड रोडवर हे उद्यान वसलेले आहे. याची रचना जपानी उद्यान पद्धतीची आहे. जपानमधील ओकोयामा शहरातील 300 वर्षांपूर्वीच्या प्रसिद्ध कोराक्वेन उद्यानाच्या धर्तीवर विकसित केलेले भारतातील एक उद्यान आहे.

विश्रामबाग वाडा

विश्रामबाग वाडा हा पेशवा दुसरा बाजीराव यांचे निवासस्थान होते. वडिलोपार्जित शनिवार वाड्यात राहण्यापेक्षा दुसरे बाजीराव यांना विश्रामबागेत राहणे पसंत होते. आता पुणे महापालिकेने या ठिकाणी एक सांस्कृतिक केंद्र सुरू केले आहे.

आगा खान पॅलेस

गांधी मेमोरिअल सोसायटीचा आगा खान पॅलेस हा खास इटालियन बनावटीचा आहे. ब्रिटिश राजवटीमध्ये या पॅलेसचा उपयोग भारत छोडो आंदोलनात सहभागी झालेल्या महात्मा गांधी, कस्तुरबा गांधी, महादेव भाई यांच्यासाठी तुरुंग म्हणून करण्यात आला होता. महादेव भाई आणि कस्तुरबा गांधी यांनी याच पॅलेसमध्ये अखेरचा श्वास घेतला होता. या पॅलेसमध्ये त्यांचे स्मारकदेखील आहे.

ओशो आश्रम

पुण्यातील ओशो आश्रम एखाद्या रिसॉर्टपेक्षा कमी नाही. शहरातील कोरेगाव पार्क भागात 28 एकरांवर पसरलेला आश्रम 1974 मध्ये ओशोंनी बांधला होता. येथे निसर्ग आणि आधुनिकतेचा एक अनोखा संगम पाहायला मिळतो. बांबूच्या कॉटेजेस, आश्रमातील संगमरवरी मंडप, कृत्रिम पाण्याचे झरे, सर्वत्र हिरवळ, थंड हवेचे झोत, मोठा जलतरण तलाव या गोष्टी प्रमुख आकर्षण आहेत.

राजीव गांधी प्राणिसंग्रहालय

राजीव गांधी प्राणिसंग्रहालय हे 'कात्रज प्राणिसंग्रहालय' म्हणूनही ओळखले जाते. हा एकूण 130 एकरांचा परिसर तीन भागांमध्ये विभागला गेला आहे: प्राणी अनाथालय, सर्पोद्यान आणि प्राणिसंग्रहालय. तसेच, 40 एकरांचे कात्रज सरोवर आहे. येथील सस्तन प्राण्यांमध्ये पांढरा वाघ, तान्हाजी नावाचा बंगाली वाघ, बिबट्या, अस्वले, सांबर, भेकर, चिंकारा, काळवीट, माकडे व हत्ती या प्राण्यांचा समावेश आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news