धक्कादायक! नवरा कोमात आहे समजून तिने मृतदेह तब्बल १८ महिने घरीच ठेवला

Coma
Coma

पुढारी ऑनलाईन डेस्क : उत्तर प्रदेशच्या कानपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नवरा कोमामध्ये (Coma) आहे असं समजून त्याच्या पत्नीने त्याचा मृतदेह एक नाही दोन नाही तर तब्बल १८ महिने घरीच ठेवला. कानपूरमधील ही विचित्र घटना वाचून तुम्हालाही धक्का बसेल. अधिक मिळालेल्या माहितीनुसार कानपूरमधील एका आयकर विभागाच्या कर्मचाऱ्याचा मृतदेह तो कोमामध्ये आहे असं समजून त्याच्या पत्नीने घरीच ठेवला. मृतदेह तब्बल १८ महिने घरी ठेवला होता. मानसिकदृष्ट्या अस्थिर असलेली त्याची पत्नी  पतीच्या मृतदेहावर दररोज सकाळी गंगाजल शिंपडायची. तिने सांगितले की गंगाजल यासाठी शिंपडायची की तिला आशा होती की तो कोमामधून बाहेर पडेल.

कानपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या व्यक्तीच्या मृत्यू प्रमाणपत्रावर एका खासगी हॉस्पिटलने त्या व्यक्तीचा मुत्यू कार्डियाक रेस्पिरेटरी सिंड्रोममुळे २२ एप्रिल २०२१ रोजी  झाल्याचे नमूद केले होते. याबाबत मुख्य वैद्यकीय अधिकारी (CMO) डॉ. अलोक रंजन म्हणाले, विमलेश दिक्षित हे आयकर विभागात कार्यरत होते. गेल्यावर्षी एप्रिल महिन्यात त्यांचा मृत्यू झाला. पण त्यांचा मृत्यू झाल्याचे त्यांचे घरचे मान्य करायला तयार नव्हते. कारण त्यांना वाटत होते की, विमलेश हे कोमामध्ये आहेत. मला कानपूर आयकर विभागाकडून सांगण्यात आले होते की, या प्रकरणाची चौकशी करा. कारण पेन्शन फाईलच काम प्रलंबित होते.

जेव्हा वैद्यकीय पथक आणि पोलिस चौकशीसाठी कानपूरमधील रावतपूर येथे  दीक्षित यांच्या घरी  शुक्रवार ( दि. २३) गेले तेव्हा त्यांच्या कुटुंबियांनी सांगितले दीक्षित हे जिवंत असून ते कोमामध्ये आहेत. पण वास्तव वेगळेच होते. त्यानंतर पोलिस आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांना दीक्षित यांच्या कुटुंबातील सदस्यांनी आरोग्य पथकाला मृतदेह लाला लजपत राय (LLR) रुग्णालयात नेण्याची परवानगी दिली. तिथे वैद्यकीय चाचण्या केल्यानंतर त्यांना मृत घोषित करण्यात आले. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी तीन सदस्यीय समिती स्थापन  करण्यात आली असून लवकरात लवकर त्याचे निष्कर्ष सादर करण्यास सांगितले आहेत.

गंभीब बाब म्हणजे मृतदेह घरात १८ महिने राहिल्याने तो सडलेल्या अवस्थेत झाला होता. दरम्यान, एका अधिकाऱ्याने खुलासा केला की दीक्षित यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या शेजाऱ्यांनाही सांगितले होते की ते कोमात आहेत आणि त्यांची पत्नी मानसिकदृष्ट्या अस्थिर असल्याचे दिसते. शेजाऱ्यांनी पोलिसांना सांगितले की, कुटुंबातील सदस्य अनेकदा ऑक्सिजन सिलिंडर घरी घेऊन जाताना दिसत होते.

हेही वाचलंत का?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news