मराठी हातांनी पेलले बालासोरचे आपत्ती व्यवस्थापन ! जिल्हाधिकारी दत्तात्रय शिंदे ठरले शेकडो जखमींसाठी देवदूत

मराठी हातांनी पेलले बालासोरचे आपत्ती व्यवस्थापन ! जिल्हाधिकारी दत्तात्रय शिंदे ठरले शेकडो जखमींसाठी देवदूत
Published on
Updated on

दादा भालेकर : 

टाकळी ढोकेश्वर (नगर ) : पुढारी वृत्तसेवा : ओडिशातील बालासोर येथे झालेल्या भीषण रेल्वे अपघातानंतर तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आणि जखमींना लगेच आवश्यक उपचार मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलला तो बालासोरचे मराठमोळे जिल्हाधिकारी तथा पारनेरचे भूमिपुत्र दत्तात्रय शिंदे यांनी. जिल्हाधिकारी शिंदे यांच्याच नेतृत्वाखाली तातडीने बचावकार्य हाती घेऊन जखमींवर उपचार सुरू करण्यात आले. एका अर्थाने अपघातातील जखमींसाठी ते देवदूतच ठरले. गेल्या वर्षी (जून 2022) बालासोरच्या जिल्हाधिकारी पदाची सूत्रे घेतलेल्या शिंदे यांच्यासाठी रेल्वे अपघातानंतर आपत्ती व्यवस्थापनाचे मोठे आव्हान उभे ठाकले होते. आपत्ती व्यवस्थापनात नेहमीच अग्रेसर असलेल्या सरकारकडून आवश्यक सर्व सुविधा तातडीने उपलब्ध करून दिल्या जातात, यामुळे वेगाने काम करण्यास मोकळीक मिळते, असे शिंदे यांनी 'पुढारी'शी बोलताना स्पष्ट केले.

मोबाईलवरून संपर्क साधला असता, अपघाताविषयी माहिती देताना जिल्हाधिकारी शिंदे म्हणाले, अपघात झाला त्या वेळी आधी स्फोट झाल्याची माहिती फोनवरून मिळाली होती. इतका मोठा आवाज होता की तो स्फोट असावा, असे माहिती देणार्‍याला वाटले. अपघातानंतर मी पाऊण तासात घटनास्थळी पोहोचलो. त्या वेळी रुग्णवाहिका, डॉक्टर आणि स्वयंसेवकांची मोठ्या प्रमाणावर गरज होती. याची सर्व माहिती मी सरकारला दिली आणि एका तासात 100 रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आल्या. इतर ठिकाणच्या डॉक्टरांनाही घटनास्थळी पाठविण्यात आले. बरेचसे स्वयंसेवकही होते. या वेळी आधी जखमींना तातडीने बाहेर काढा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना वाचवता येईल, अशा सूचना मी स्वयंसेवकांना दिल्या.

इथली बहुतेक सर्व रुग्णालये कायम सुसज्ज असतात. सगळ्या रुग्णालयांमध्ये तातडीने आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. विशेष म्हणजे त्या मोफत असतात. घटनास्थळी पोहोचल्यावर आम्ही काही निर्णय घेतले आणि रणनीती बदलली. मृतदेह शेजारीच असलेल्या बहानगा हायस्कूलमध्ये ठेवण्यात आले आणि तेथेच शवविच्छेदन करण्यात आले. यामुळे गंभीर जखमी प्रवाशाला थेट रुग्णालयात पोहोचवून तातडीने उपचार देणे शक्य झाले, असे शिंदे म्हणाले.

अपघातातील जखमींपैकी 900 जणांना उपचारानंतर घरी सोडले असून, जवळपास 200 जणांवर अजूनही उपचार करण्यात येत आहेत. अजूनही 101 मृतदेहांची ओळख पटलेली नाही, अशी माहिती रेल्वे अधिकार्‍याकडून देण्यात आली आहे. दरम्यान, या अपघातात 40 जणांचा मृत्यू हा विजेचा झटक्याने झाल्याचे समोर आल्याचे शिंदे यांनी सांगितले. अपघातानंतरचे आपत्ती व्यवस्थापन पेलता आले असले, तरी अपघातातील मृत्यू रोखता आले नाहीत, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

पारनेरचे भूमिपुत्र
मूळचे नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील वडगाव सावतळ येथील असलेले दत्तात्रय भाऊसाहेब शिंदे सन 2016 च्या बॅचचे 'आयएएस' आहेत. जून 2022 पासून ते बालासोरचे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे प्राथमिक शिक्षण टाकळी ढोकेश्वरला, माध्यमिक शिक्षण नगर येथे झाले, तर फर्ग्युसन महाविद्यालयातून त्यांनी बीए ही पदवी घेतली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news