पुढारी ऑनलाईन डेस्क : इंडिया आघाडीची आज (दि.१७ मार्च) मुंबईतील शिवाजी पार्क येथे सभा होणार आहे. यावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे गटावर बोचरी टीका केली आहे.
इंडिया आघाडीच्या सभेबाबत माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाल की, "शिवसेनेसाठी आजचा दिवस काळा दिवस आहे. शिवाजी पार्कमधून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी संपूर्ण देशाला मार्गदर्शन केले, त्याच शिवाजी पार्कवरील उद्यानात इंडिया आघाडीची सभा होत आहे. वीर सावरकरांविरोधात बोलणाऱ्यांनी त्यांच्यावर आरोप केले आहेत. यात सहभागी होत आहेत, हे दुर्दैव आहे. आगामी निवडणुकीत जनता त्यांना धडा शिकवेल."
काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा मुंबईत दाखल झाली असून, आज शिवाजी पार्कवर इंडिया आघाडीची सभा पार पडत आहे. या सभेच्या निमित्ताने इंडिया आघाडीच्या लोकसभा निवडणूक प्रचाराचा नारळ मुंबईतून फुटणार आहे.
इंडिया आघाडीच्या सभेसाठी तामिळनाडूचे मुख्यमंत्री आणि डीएमके नेते एम. के. स्टॅलिन, समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव, राष्ट्रीय जनता दलाचे तेजस्वी यादव, झारखंडचे मुख्यमंत्री चंपई सोरेन, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार, शिवसेनेचे उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत. ही सभा विराट असेल, असा दावा या सभेच्या समन्वय समितीचे अध्यक्ष आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला.संध्याकाळच्या सभेपूर्वी इंडिया आघाडीची बैठक होण्याची शक्यता आहे. या बैठकीला हे सर्व नेते उपस्थित राहणार आहेत.