पृथ्वीच्या पोटातही ‘हवामान बदल’!

पृथ्वीच्या पोटातही ‘हवामान बदल’!

न्यूयॉर्क : संशोधकांनी म्हटले आहे की जागतिक तापमानवाढ वेगाने होत आहे व त्यामुळेच 'अंडरग्राऊंड क्लायमेट चेंज'ही होत आहे. याचा अर्थ पृथ्वीच्या पोटात, जमिनीखालीही 'हवामान बदल' घडत आहे. त्यासाठी मानवाने निर्माण केलेली बांधकामे सज्ज झालेली नाहीत. सोप्या शब्दात सांगायचे तर शहरात बनत असलेल्या बहुमजली इमारती अशा अंडरग्राऊंड क्लायमेट चेंजच्या द़ृष्टीने डिझाईन केलेल्या नाहीत. त्यामुळे त्यांनाही धोका निर्माण होत आहे.

इमारती आणि अंडरग्राऊंड ट्रान्सपोर्टेशनमधून (भूमिगत परिवहन) बाहेर पडणार्‍या उष्णतेने पृथ्वीचे तापमान दर दहा वर्षांमध्ये 0.1 ते 2.5 अंश सेल्सिअसपर्यंत वाढत आहे. जमीन उष्ण झाल्याने तिचे 'डिफॉर्मेशन' म्हणजेच विरुपण होते. यामुळे जमीन एक तर फैलावू लागते किंवा आकुंचित होऊ लागते. त्यामुळे इमारतींचा पाया कमजोर होऊ लागतो व इमारतींमध्ये भेगा पडू लागतात. त्यामुळे त्या कोसळण्याचा धोकाही वाढतो.

नॉर्थवेस्टर्न युनिव्हर्सिटीमधील सिव्हिल अँड एन्व्हायर्न्मेंटल इंजिनिअरिंगचे प्राध्यापक एलेसेंड्रो रोटा लोरिया यांनी सांगितले की सध्याच्या काळात तापमान वाढल्याने जमिनीचे विरुपण होत आहे. आपले एकही सिव्हिल स्ट्रक्चर किंवा इन्फ्रास्ट्रक्चर या बदलासाठी तयार नाही. लोरिया आणि त्यांच्या सहकार्‍यांनी जमिनीच्या वरील आणि खालील तापमानाचा अभ्यास केला. त्यासाठी त्यांनी शिकागो शहराचा एखाद्या प्रयोगशाळेसारखा वापर केला.

शिकागोमधील अशा भागात त्यांनी सेन्सर बसवले जिथे बहुमजली इमारती आणि अंडरग्राऊंड ट्रान्सपोर्टेशन आहे. जिथे जमिनीखालील अशी वाहतूक नाही अशा ठिकाणीही सेन्सर बसवले. या संशोधनातून आढळले की ज्या परिसरात बहुमजली इमारती आणि अंडरग्राऊंड ट्रान्सपोर्टेशन आहे तो उष्णतेच्या बाबतीत कमजोर आहे. संशोधनात असेही आढळले की उष्णतेच्या कारणामुळे शहराची जमीन बारा मिलिमीटरपर्यंत फैलावली आहे. तसेच बहुमजली इमारतींच्या खाली असणारी जमीन 8 मिलिमीटरपर्यंत आकसली आहे. संशोधकांच्या मते, हे बदल धोकादायक आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news