नाशिक : पुढारी वृत्तसेवा
केवळ एका वाहक पुरवठादार ठेकेदाराच्या आडमुठेपणामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 'दत्तक नाशिक'मधील सिटीलिंकचा संप सोमवारी(दि.१८) पाचव्या दिवशीही सुरूच राहिल्याने सार्वजनिक परिवहन व्यवस्था पुरती कोलमडून पडली. यामुळे एकीकडे नाशिककरांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला असताना दुसरीकडे संपामुळे चक्काजाम झालेल्या २१० बसेसचे भाडे मात्र आॉपरेटर्सना अदा करावेच लागत असल्यामुळे सिटीलिंकला दररोज साडेआठ लाख रुपयांचा फटका बसत आहे.
अल्पावधीतच प्रवाशांच्या पसंतीस उतरलेल्या सिटीलिंकच्या बससेवेला वाहक पुरवठादाराच्या आडमुठेपणाच्या धोरणामुळे नालस्ती सहन करावी लागली आहे. या ठेकेदारामुळे गेल्या दोन वर्षांत सिटीलिंकला तब्बल नऊ वेळा संपाला सामोरे जावे लागले आहे. त्यानंतरही या ठेकेदाराचे लांगुलचालन प्रशासनाकडून सुरूच असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. नवीन ठेकेदार नेमणुकीसाठी प्रक्रिया सुरू असल्याचे प्रशासनाकडून सांगितले जात असले तरी अद्यापही नवीन ऑपरेटरची नियुक्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे बससेवा बंद ठेवण्यापलीकडे सिटीलिंक प्रशासनासमोर पर्याय उरलेला नाही. सिटीलिंकने बस आॉपरेटर्ससमवेत केलेल्या करारानुसार बसेस धावल्या नाहीत तरी प्रतिबस किमान २०० किलोमीटरचे भाडे आॉपरेटर्सना अदा करण्याची तरतूद आहे. सुमारे ८५ रुपये प्रतिकिमी दराने हे पैसे अदा केले जातात. सिटीलिंकच्या संपामुळे बसेस डेपोत उभ्या असल्यामुळे २० टक्के पैसे आॉपरेटर्सना नुकसानभरपाईपोटी अदा करावे लागतात. २१० बसेसचे प्रत्येकी चार हजार रुपयांप्रमाणे साडेआठ लाख रुपये दररोज अदा करावे लागत आहेत. पाच दिवसांत ४२ लाख रुपये ऑपरेटर्सना अदा करावे लागले आहेत.
ठेकेदाराचे लांगुलचालन कशासाठी?
दिल्लीस्थित 'मॅक्स डिटेक्टिव्हज ॲण्ड सिक्युरिटीज' या वाहक पुरवठादार ठेकेदाराच्या आडमुठेपणामुळे गेल्या दोन वर्षांत सिटीलिंकला तब्बल नऊ वेळा संपाची नामुष्की सहन करावी लागली आहे. त्यानंतरही या ठेकेदाराचे लांगुलचालन प्रशासनाकडून सुरूच आहे. कराराचे उल्लंघन केल्याप्रकरणी ठेकेदाराला दीड कोटीपेक्षा अधिक दंड बजावण्यात आला आहे. हा दंड माफ करण्याची मागणी ठेकेदाराकडून केली जात आहे. वाहकांना वेतन न देता संपास भाग पाडण्याचा अट्टहास या देयकांसाठीच केला जात असल्याची चर्चा आहे.
दोन वर्षांतील सर्वात मोठा संप
सिटीलिंकने आतापर्यंत १ सप्टेंबर २०२२, ६ डिसेंबर २०२२, ६ एप्रिल २०२३, ११ मे २०२३, १८ व १९ जुलै २०२३, ४ ऑगस्ट २०२३, २२ नोव्हेंबर २०२३ तसेच फेब्रुवारी २०२४ व १४ मार्च २०२४ पासून अशी नऊ वेळा संपाची नामुष्की सहन केली आहे. यंदा पाच दिवसांपासून सुरू असलेला हा संप आजवरचा सर्वात मोठा संप म्हणावा लागेल. यामुळे चाकरमान्यांचे हाल तर झालेच, पण त्याचबरोबर एेन परीक्षाकाळात झालेल्या या संपामुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.