कोल्हापूर : 8.50 कोटींच्या 1718 दुचाकी, दीड कोटीच्या 40 मोटारी लंपास!

कोल्हापूर : 8.50 कोटींच्या 1718 दुचाकी, दीड कोटीच्या 40 मोटारी लंपास!

कोल्हापूर, दिलीप भिसे : सराईत वाहन चोरट्यांनी शहर, जिल्ह्यात अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. मध्यवर्ती बाजारपेठांसह गजबजलेल्या परिसरातून वाहनांचे लॉक तोडून, बनावट किल्ल्यांचा वापर करून महागडी वाहने हातोहात लंपास करण्याचा कुख्यात टोळ्यांचा उद्योगच सुरू झाला आहे. 2021, 2022 व दि.1 जानेवारी ते 30 मार्च 2023 या काळात साडेआठ कोटींच्या 1718 दुचाकी आणि सुमारे दीड कोटीच्या 40 आलिशान मोटारींना चोरट्यांनी लक्ष्य केले आहे. चोरट्यांचा बिनभांडवली धंदा जोमात चालला आहे.

शहर, जिल्ह्यातील सराईत टोळ्यांसह सीमाभागातील पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगारांनी झटपट कमाईसाठी वाहन चोरीचा उद्योग चालवला आहे. रात्री-अपरात्री नव्हे, भरदिवसा मध्यवर्ती चौकात पार्किंग केलेली वाहने क्षणार्धात लंपास करण्यात चोरटे सराईत बनले आहेत. लॉक तोडून, बनावट किल्ल्यांचा लिलया वापर करून महागडी वाहने पळवली जात आहेत.

वाहन चोरट्यांची जिल्ह्यात दहशत

सीपीआर, अंबाबाई मंदिर परिसर, भवानी मंडप, बिंदू चौक, मिरजकर तिकटी, संभाजीनगर, महाद्वार रोड, भाऊसिंगजी रोड, स्टेशन रोड, मध्यवर्ती बसस्थानक, शाहूपुरी, राजारामपुरीसह रंकाळा, गंगावेस, पापाची तिकटी, शिवाजी पूल, व्हीनस कॉर्नर, ताराराणी पुतळा परिसरासह मार्केट यार्डातही वाहन चोरीच्या घटनांचा टक्का वाढला आहे. शहराशिवाय इचलकरंजी, जयसिंगपूर, शिरोळ, नृसिंहवाडी, कुरूंदवाड, वडगाव, शहापूर, कागल, मूरगूड, आजरा चंदगड परिसरातही वाहन चोरट्यांनी दहशत निर्माण केली आहे.

वाहनांचा पाच, दहा हजारांत सौदा!

दुचाकी, चारचाकी वाहनांची चोरी म्हणजे विनासायास मिळकत देणारा धंदा…चोरीच्या वाहनांचाही झटपट विक्रीचा फंडा राबवला जातो. पाच हजारांपासून पंधरा हजारांच्या भावात सौदा ठरतो. विशेषकरून ग्रामीण भागात अशा वाहनांची चलती आहे. सीमाभागात सराईत गुन्हेगारी टोळ्यांकडून दारू, गुटख्यासह अंमली पदार्थांच्या तस्करीसाठी वाहनांचा सर्रास वापर केला जात आहे.

सुट्ट्या पार्टस्ना फुल्ल मार्केट

अलीकडच्या काळात दुचाकींसह मोपेडच्या किमतीतही अफाट वाढ झाली आहे. दुचाकींच्या स्पेअर पार्टनाही बाजारात मागणी असल्याने चोरीतील वाहनांची अवघ्या पाच, दहा मिनिटांत विल्हेवाट लावली जाते. सुट्ट्या पार्टस्ची भंगारात विक्री केली जाते. शहर, जिल्ह्यात अशा घटना बेधडक सुरू आहेत. अशा कृत्यात गुरफटलेल्या सराईत टोळ्यांचा पर्दाफाश होण्याची गरज आहे.

खरेदीदार मंडळींचीही 'जेल'वारी

इचलकरंजी, जयसिंगपूर, हुपरीसह गडहिंग्लज परिसरात वाहनचोरीच्या घटनांचा आलेख वाढत राहिल्याने अप्पर पोलिस अधीक्षक निकेश खाटमोडे-पाटील यांनी दोन महिन्यांत शोधमोहीम राबवून 100 दुचाकी हस्तगत केल्या आहेत. 35 चोरट्यांना बेड्या ठोकून चोरीची वाहने खरेदी करणार्‍या 25 जणांना सहआरोपी करून त्यांनाही 'कळंबा जेल'ची वारी घडवली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news