केडगाव : पुढारी वृत्तसेवा : दौंड तालुक्यासह जिल्ह्यातच जलजीवन मिशन पाणी योजनेत मोठा घोटाळा झाल्याचा संशय व्यक्त होत असून, यासाठी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे तत्कालीन कार्यकारी अभियंता प्रकाश खताळ आणि जिल्ह्यातील त्यांच्या सर्व टीमची सखोल चौकशी करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. अधिकार्यांनी ठेकेदारांच्या भल्यासाठीच काम केले आहे, असा आरोप होऊ लागला आहे. दै. 'पुढारी'तून या जलजीवन मिशन योजनेच्या दौंड तालुक्यातील गैरकारभाराचा पर्दाफाश झाल्याची दखल घेऊन खताळ यांच्या बदलीने त्यांच्या जागेवर आलेले नवीन जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अमित पाठवणे यांनी मंगळवारी (दि. 13) पुण्यात दौंडच्या सर्व अधिकार्यांची बैठक घेऊन चांगलीच झाडाझडीत घेतल्याचे समजते.
दै. 'पुढारी'मध्ये याबाबतचा सविस्तर वृत्तान्त गेला आठवडाभर प्रकाशित झाल्याने जनतेमध्ये याबाबत जागृती होऊन ग्रामस्थांनी आता या सर्व विभागाच्याच चौकशीची मागणी केली आहे.
जिल्ह्यात या योजनेवर दोन हजार कोटींपेक्षा अधिक खर्च होत असताना एकाही तालुक्यात काही अपवाद वगळता या योजनेची पूर्ण कामे झालेली नाहीत. अधिकार्यांच्या मदतीने ठेकेदारांनी बेबनाव करीत या योजना पूर्ण करण्याचे सोडून अर्धवट सोडून 'टाईमपास' सुरू केला आहे. योजना पूर्ण करण्याच्या मुदती बहुतांश ठिकाणी संपूनही अधिकार्यांनी याबाबत कुठल्याच ठेकेदाराला कामासंदर्भात साधे पत्रही दिलेले नाही, असा आरोप केला जात आहे.
याचे उत्तम उदाहरण म्हणजे दौंड तालुक्यातील सावळागोंधळ आहे. सध्या दौंड तालुक्यामध्ये या कामाचा मोठा सावळागोंधळ झाला असून, जवळपास 300 कोटींच्या आसपास खर्च केला जाणार आहे. याचा खरा आकडा समजू नये म्हणून अधिकार्यांनी पुरेपूर व्यवस्था केल्याने ही रक्कम यापेक्षा अधिक असावी, असा संशय व्यक्त होत आहे. दै. 'पुढारी'च्या वृत्त मालिकेनंतर अनेक अधिकार्यांना त्यांची बाजू घेण्यासाठी संपर्क केला. परंतु, 'हाताची घडी तोंडावर बोट' अशी त्यांची भूमिका आहे.
कोट्यवधी रुपयांच्या या योजनांसाठी या विभागाने चार तालुक्यांसाठी एक उपकार्यकारी अभियंता अशी व्यवस्था केलेली आहे. हे अधिकारी दौंड, इंदापूर, भोर, वेल्हा या तालुक्यांचे काम पाहत असतात. भोरमध्ये 160 कोटींची कामे, दौंडमध्ये ते 300 कोटींच्या पेक्षाही जास्त, इंदापूर साधारण 300 कोटी, साधारण 1000 कोटी रुपयांच्या कामासाठी एकाच अधिकार्याला काम करावे लागत आहे.
कामाच्या गुणवत्तेकडे पाहणे अवघड असतानासुद्धा जिल्हा परिषदेचा बांधकाम विभाग आणि ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी या घटनेकडे गांभीर्याने पाहिलेले नसल्याने आजदौंडमधील सर्वच योजना अपूर्ण होऊन नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी अडचण करून बसलेले आहेत.
दौंड तालुक्यात ठेकेदार आणि अधिकार्यांनी मोठा धुमाकूळ घातला असून, योजनेच्या मंजुरीपासून ते आत्तापर्यंतच्या कालखंडात या दोघांच्या कारभाराने मोठा गोंधळ निर्माण केला आहे. दै. 'पुढारी'तून आलेल्या बातम्यांच्या आधारे दौंड तालुक्यातील योजनांची सखोल चौकशी करण्यात येईल.
– अमित पाठवणे, कार्यकारी अभियंता