बीजिंग/वॉशिंग्टन, वृत्तसंस्था : तैवानच्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत आपले कसब आजमावल्यानंतर चीन आता कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) माध्यमातून तयार केलेल्या कंटेंटचा वापर भारतातील लोकसभा निवडणुकांतून करण्याच्या तयारीत आहे, असा धोक्याचा इशारा मायक्रोसॉफ्ट या बहुराष्ट्रीय तंत्रज्ञान कंपनीने दिला आहे.
चीन सरकारचा सायबर चमू अमेरिका आणि दक्षिण कोरियामधील निवडणुकांनाही टार्गेट करण्याचा प्रयत्न करू शकतो. चीनच्या या सायबर चमूला उत्तर कोरियातून मोठे पाठबळ आहे, असे मायक्रोसॉफ्ट थ्रेट इंटेलिजन्सच्या विश्लेषणातून समोर आले आहे.
मीम्स, व्हिडीओ आणि ऑडिओ कंटेंटवर चीनचा भर असेल. तो अधिक प्रभावी ठरू शकतो, असेही या अहवालात म्हटले आहे. फ्लॅक्स टायफून या चिनी सायबर चमूकडून वारंवार दूरसंचार क्षेत्रावर हल्ले होत असतात. फ्लॅक्स टायफूनने 2023 च्या सुरुवातीला आणि पुढे हिवाळ्यातही भारत, फिलिपाईन्स, हाँगकाँग आणि अमेरिकेला टार्गेट केले होते.
स्टॉर्म-1376 हा आणखी एक चिनी कम्युनिस्ट पार्टीशी संबंधित सायबर चमू असून त्याने म्यानमारमधील अशांततेला भारत आणि अमेरिका जबाबदार असल्याचा आरोप केला होता. मँडरीन (चिनी भाषा) आणि इंग्रजीमध्ये एआय-जनरेटेड व्हिडीओ पोस्ट केले होते.
पीएमओ/गृह मंत्रालयासह एअर इंडिया, रिलायन्समध्येही शिरकाव
यावर्षी फेब्रुवारीत एका चिनी हॅकर ग्रुपने भारतातील पंतप्रधान कार्यालय, गृह मंत्रालय, रिलायन्स आणि एअर इंडियासारख्या समूहांनाही टार्गेट केले होते. 'द वॉशिंग्टन' पोस्टने याबाबतचे वृत्तही दिले होते. हॅकर्सनी भारत सरकारच्या 95.2 गीगाबाईटस् इमिग्रेशन डेटामध्ये शिरकाव केला होता.