प्रज्ञा केळकर-सिंग
पुणे, पुढारी वृत्तसेवा: मोबाईलशी जमलेली गट्टी…कोरोना काळात वाढलेला स्क्रीन टाईम…वेगवान मोबाईल गेम्सचे अतिवेड…रिल्स आणि शॉट्सचा भडिमार यामुळे लहान मुलांच्या मानसिकतेवर परिणाम होत आहे. हिंसक वृत्ती वाढीस लागणे, पटकन राग येणे, एकलकोंडेपणा, नैराश्य, एकाग्रता कमी होणे, अशा समस्या लहान मुलांमध्ये वेगाने वाढताना दिसत आहेत.
ब्लू व्हेल, पब्जी आदी गेम्सच्या आहारी गेल्यामुळे गेल्या तीन-चार वर्षांमध्ये काही मुलांना जीव गमवावा लागला. याशिवाय माईनक्राफ्ट, जीटीएवाय सिटी, सीओसी अशा अनेक गेममुळे मुले हिंसक होत आहेत. पालकांनी मोबाईल काढून घेणे, नवीन मोबाईल घेऊन न देणे यामुळे राग येऊन मुलांनी जीवन संपवल्याच्या विदारक घटनाही आजूबाजूला घडतात. स्क्रीन टाईममुळे केवळ शारीरिक नव्हे, तर मानसिक नुकसान होत असल्याचे निरीक्षण मानसोपचारतज्ज्ञांनी नोंदवले आहे. आभासी जगात रमणारी मुले समाजापासून दुरावत चालली आहेत.
ऑनलाईन खेळामधील टास्क पूर्ण करण्याचे आव्हान, जिंकण्याचे आमिष यामुळे मुलांचा स्क्रीन टाईम वाढला आहे. कार्टूनमधील किंवा रिल्समधील भाषा ऐकून मुलांच्या दैनंदिन आयुष्यात असभ्य भाषेचा वापरही बाबही चिंताजनक ठरत आहे. त्यामुळे मुलांच्या स्क्रीन टाईमवर नियंत्रण आणून, त्यांना वास्तव जगात रमायला शिकवून, वाचन, भटकंती, संगीत अशा सवयी लावून मुलांना माणसात आणणे, हे पालकांसमोरील मोठे आव्हान ठरत आहे, असे बालमानसोपचारतज्ज्ञ डॉ. गीता पाठक यांनी 'पुढारी'शी बोलताना सांगितले.
स्क्रीन टाईमचा मुलांच्या मानसिकतेवर, सर्जनशीलतेवर परिणाम होतो. मोबाईलवर सातत्याने गेम खेळल्याने पाठीचे दुखणे, डोळ्यांच्या समस्याही उद्भवतात. मुलांचे मानसिक आरोग्य जपण्यासाठी पालकांनी काही वेळा कठोर व्हायलाही हरकत नाही. मुलांना मोबाईल खेळण्याचा दिवस आणि तास ठरवून द्यावेत.
– डॉ. शिरीष महाजन, बालमानसोपचारतज्ज्ञ
– कोणत्याही परिस्थितीला आक्रमक प्रतिसाद देणे
– नकारात्मकता वाढीस लागणे.
– चिडचिड, नैराश्य वाढणे.
– एकलकोंडेपणा येणे.
– संवादाची कमतरता.
– आजूबाजूच्या जगाशी, माणसांशी संपर्क न राहणे.
– हट्टीपणा, खोटे बोलण्याची वृत्ती वाढणे.
– हिंसक होणे
– जागतिक आरोग्य संघटनेने गेमिंग डिसऑर्डरला वेगाने वाढणारी आरोग्य समस्या म्हणून अधोरेखित केले आहे.
– युनिसेफच्या अहवालानुसार, जगातील 120 कोटी किशोरवयीन मुले मोबाईल गेम्सच्या आहारी गेली आहेत.
– जर्नल सायकोलॉजिकल मेडिसीनमध्ये मुलांच्या वाढत्या रागाचे कारण स्क्रीन टाईम असल्याचे नोंदवण्यात आले आहे.
– घरात सर्वांनी आठवड्यातील एक दिवस 'नो स्क्रीन टाईम' दिवस पाळावा.
– मुलांना मैदानी खेळ खेळण्याची सवय लावावी.
– पालक आणि मुलांमधील संवाद वाढायला हवा.
– बौद्धिक विकासाला चालना देणारे खेळ खेळावेत.
– मुलांना आवडीचे छंद जोपासण्याची सवय लावावी.
– नातेवाईक, मित्र-मैत्रिणी यांच्यासह गप्पांचे, भटकंतीचे बेत आखता येतील.