नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महाराष्ट्रातील गड-किल्ले आपली ऐतिहासिक संपत्ती असून, नाशिकलाही गड-किल्ल्यांची मोठी परंपरा लाभलेली आहे. या संपत्तीची पडझड झाली आहे. या संपत्तीचे जपणूक करणे सर्वांचे कर्तव्य असून, त्यासाठी राज्यस्तरावर दुर्ग प्राधिकरण स्थापन करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. ऐतिहासिक घटनांचे साक्षीदार असलेल्या नाशिकचा विकासाच्या माध्यमातून बदल करण्याची ग्वाही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.
नाशिकमध्ये शुक्रवारी (दि.२१) एका कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर पालकमंत्री दादा भुसे, माजी खासदार युवराज संभाजीराजे, खासदार हेमंत गोडसे, आ. सीमा हिरे आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, राज्यातील गड-किल्ले हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या उत्कृष्ट स्थापत्यशैलीचे प्रतीक आहेत. या संपत्तीच्या रक्षणासाठी व संवर्धनासाठी हजारो युवक पुढे येऊन काम करण्यासाठी तयारी दर्शवित आहेत. राज्याच्या दृष्टीने ही अभिमानास्पद बाब असल्याचे कौतुकोद्गार शिंदे यांनी काढले.
नाशिक जिल्ह्याच्या निर्मितीला १५१ वर्षे पूर्ण झाली असून, ही राज्यातील महत्त्वाची ओळख आहे. प्रभू श्रीरामचंद्र आणि संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी स्वराज्याच्या रक्षणातही महत्त्वाचे केंद्रबिंदू होती. अशा या शहराने आपली मूळ ओळख जपत प्रगतीची उंच भरारी घेतल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. तसेच या शहराच्या सर्वांंगीण विकासासाठी शासन विविध माध्यमातून मदत करत असल्याचे त्यांनी सांगितले. नाशिक शहराचे वैभव जपायचे असून, त्यासाठी राज्य शासन योगदान देईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. अतिवृष्टी व सततच्या पावसाने बाधित शेतकऱ्यांना नियम बाजूला ठेवून सर्वतोपरी मदत करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
पर्यटनाचा आम्हाला अनुभव….
माजी खासदार युवराज संभाजीराजे यांनी कार्यक्रमात नाशिक पर्यटनाच्या दृष्टीने मागे पडल्याची भावना बोलून दाखविली. हाच धागा पकडून मुख्यमंत्री शिंदे यांनी तीन महिन्यांपूर्वी आम्ही मोठे पर्यटन करून आल्याचे सांगताच सभागृहात हशा पिकला. पर्यटनाचा चांगला अनुभव आम्हाला आहे. हे आपले सरकार आहे. नाशिकच्या मंदावलेल्या पर्यटनाला आम्ही चालना देऊ, असे ना. शिंदे यांनी सांगितले.
विकासाला प्राधान्य….
2027 ला नाशिकमध्ये कुंभमेळा होणार आहे. कुंभमेळ्यासाठी कोणतीही गैरसोय होणार नाही, याची काळजी घेतानाच नाशिककरांच्या विकासाला प्राधान्य दिले जाईल, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. तसेच नगरविकास विभाग माझ्याकडे असून, नाशिक महानगर विकास आराखड्यात स्वतः लक्ष घालणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वेमार्गासाठी केंद्रस्तरावर पाठपुराव्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.
शाहू महाराजांचे स्मारक उभारावे : संभाजीराजे
कोल्हापूरनंतर नाशिक हे राज्यातील सर्वगुण संपन्न शहर आहे. पण, या शहरातील पर्यटन मंदावले असून, त्याला चालना देण्यासाठी शासनाने पुढाकार घ्यावा. राज्यातील सर्वाधिक किल्ले नाशिक जिल्ह्यात असून, राजगडच्या धर्तीवर त्यांचे संवर्धन करावे, अशी सूचना माजी खासदार युवराज संभाजीराजे यांनी केली. छत्रपती शाहू महाराज यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त नाशिकमध्ये त्यांचे पूर्णाकृती स्मारक उभारण्याची मागणी त्यांनी केली. बळीराजासाठी विशेष पॅकेजच घोषित करावे, असेही ते म्हणाले.