मुंबई : मातोश्री 1 ते मातोश्री 2 मोर्चा काढा

file photo
file photo

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : कोरोना काळातील गैरव्यवहारांची ईडीकडून चौकशी सुरू झाल्याने धाबे दणाणलेल्या आदित्य सेनेने मुंबई महापालिकेवर मोर्चा नेण्याऐवजी मातोश्री 1 ते मातोश्री 2 मोर्चा काढायला पाहिजे होता, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाच्या मोर्चाची खिल्ली उडवली आहे. ठाकरे गटाने शनिवारी काढलेल्या मोर्चाचे ठिकाण चुकले आहे. जो काही गैरव्यवहार झाला आहे 'मातोश्री'मध्ये झाला आहे.

बुलडाणा येथील अपघातात 25जणांचा मृत्यू झाल्याने संवेदनशील असल्याने भाजपने मोर्चा रद्द केला. मात्र, कोणतीही संवेदना न उरलेल्या व केवळ राजकारण करणार्‍यांनी मोर्चा काढला, अशी टीकाही मुख्यमंत्र्यांनी केली.

हा मोर्चा म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत. कोव्हिड सेंटर लोकांना जगवण्यासाठी बनवली होती की, मारण्यासाठी हा प्रश्न निर्माण झाला आहे. बोगस कोव्हिड सेंटर, बोगस डॉक्टर, बोगस ऑक्सिजन प्लांट उभारण्यात आले, सदोष ऑक्सिजन प्रकल्पांमुळे रुग्णांना ब्लॅक फंगस आजार झाला. एवढेच नव्हे, मृतांच्या टाळूवरील लोणी खाणार्‍यांनी कोरोना काळातील मृत व्यक्तींंचे मृतदेह नेण्यासाठी वापरण्यात येणार्‍या बॉडीबॅगसाठी सहाशे रुपयांऐवजी तब्बल साडेसहा हजार रुपये खर्च केले. आम्ही ठाण्यात तीच बॅग अवघ्या 325 ला घेतली. काही जण ठाण्यातील व्यवहारांची चौकशी लावण्याची चर्चा करत आहेत. मात्र, कोणताही गैरव्यवहार झालेला नसल्याने बिनधास्त चौकशी लावा, असे आव्हान मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना दिले.

मुंबई महापालिकेत झालेल्या गैरव्यवहारांबाबत ईडी चौकशी करत आहे. ही चौकशी आम्ही लावली नाही; मात्र चौकशी सुरू झाल्याने घाबरलेल्या विरोधकांनी आमच्यावर आरोप करण्यास सुरुवात केली. मुंबईत सिमेंट काँक्रीटचे रस्ते 20 वर्षांपूर्वी करायची गरज होती. तर महापालिकेचे साडेतीन हजार कोटी रुपये वाचले असते. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. शिवसेना-भाजपचे युती सरकार राज्यात आल्यावर आम्ही विकासकामांचा धडाका लावला आहे. त्यामुळे विरोधकांना पोटदुखी झाली आहे, ती पोटदुखी पळवण्यासाठी आम्ही बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू केला आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news