अमित शहा मुंबईत; शिंदे आज जाणून घेणार भाजपची ‘मन की बात’ ?

अमित शहा मुंबईत; शिंदे आज जाणून घेणार भाजपची ‘मन की बात’ ?
Published on
Updated on

मुंबई : गौरीशंकर घाळे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शंभराव्या 'मन की बात' कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज मुंबईत दाखल होत असून, नागपुरात हुकलेली संधी मुंबईत साधत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शहांकडून मुख्यमंत्री बदलाच्या चर्चांवर भाजपची 'मन की बात' जाणून घेऊ शकतात.

मुख्यमंत्री बदलाच्या चर्चा राजकीय भूकंपाच्या इशाऱ्यांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अचानक तीन दिवसांच्या सुट्टीवर साताऱ्यातील गावी निघून गेले होते. त्यातच बुधवार आणि गुरुवार असे दोन दिवस अमित शहा यांचा नागपूर दौरा ठरल्याने सुट्टी सोडून मुख्यमंत्र्यांनी थेट नागपूर गाठले होते. अमित शहा मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी एकत्रित चर्चा करणार असल्याचे म्हटले जात होते. याच बैठकीत संभाव्य मुख्यमंत्री बदलासह राजकीय वरून समीकरणांवर काही खुलासे थेट शहांकडूणन घेण्याचा विचार शिंदे करत होते. मात्र, ऐन वेळी शहांचा नागपूर दौराच रद्द झाला आणि भाजपच्या मनात नेमके काय सुरू आहे याचा खुलासा शिंदे यांना काही होऊ शकला नाही. राज्यातील सत्तासंघर्षावर घटनापीठाचा निकाल आल्यानंतर काय होईल, कसे होईल ही राजकीय धाकधूक त्यामुळे शिंदे गटात कायम आहे.

आता मन की बातच्या शतकोत्सवाच्या निमित्ताने अमित शहा रविवारी सकाळी साडेदहा वाजता मुंबई विमानतळावर दाखल होतील तेव्हा स्वागताला मुख्यमंत्री शिंदे उपस्थित असतील. शहा विमानतळावरून जवळच विले-पार्ल्यातील डहाणूकर महाविद्यालयात मन की बात कार्यक्रमाला रवाना होणार असल्याने या काही मिनिटांच्या प्रवासात मुख्यमंत्री शहांसोबत संवाद साधू शकतात. मन की बात कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस हे देखील सहभागी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे एकीकडे मन की बात पूर्ण होईपर्यंत या तिन्ही नेत्यांमध्ये डहाणूकरमध्येही चर्चा शक्य आहे.

मन की बातनंतर साडेअकराच्या सुमारास शहांचा ताफा कांदिवलीला रवाना होईल. तिथे त्यांच्या कुटुंबातील एका लग्नसोहळ्यात ते सहभागी होतील. दुपारी तीनपर्यंत ते या सोहळ्यात असतील. शहा यांचा हा खासगी दौरा असल्याने दुपारी तीन वाजेपर्यंतचे कार्यक्रम राखीव असले तरी त्यातून राज्यातील राजकीय चर्चांवर शिंदे फडणवीस यांचे शहांशी बोलणे होऊ शकते, असे सूत्रांचे म्हणणे आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री शिंदे यांचा रविवारचा अधिकृत कार्यक्रम शनिवारी रात्री उशीरापर्यंत ठरलेला नव्हता. अमित शहांचे वेळापत्रक पाहून तो ऐन वेळी ठरवला जाण्याची शक्यता आहे. फडणवीस यांच्या कार्यक्रम पत्रिकेत ते नागपुरात मन की बात कार्यक्रम पाहणार असल्याचे नमूद आहे. मात्र, स्वतः शहा मुंबई दौऱ्यावर असल्याने मॉरिशसहून परतलेले फडणवीस नागपूरऐवजी मुंबईतच मन की बात करतील, अशी शक्यता आहे.

त्यानिमित्ताने शिंदे आणि फडणवीसांना राज्यातील राजकीय समीकरणांबाबत दिल्लीच्या हवेचा अंदाज घेण्याची संधी मिळू शकते. मात्र, अमित शहा हे सहसा आपली रणनिती लक्षात येऊ देत नाहीत. त्यामुळे मुख्यमंत्री बदलाच्या चर्चेने एकनाथ शिंदे अस्वस्थ असले तरी त्यांना शहांकडून याबाबत उत्तरे मिळतील का, अशी शंका जाणकारांना वाटते आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news