अत्यंत त्रासदायक कांजिण्यांचा फैलाव कसा होतो?

अत्यंत त्रासदायक कांजिण्यांचा फैलाव कसा होतो?

कांजिण्या हा जीवघेणा आजार नाही; मात्र हा अत्यंत त्रासदायक आजार आहे. एकदा कांजिण्या आल्यानंतर त्या शरीरावर आठवडाभर राहतात. त्याची तीव्रताही अधिक असते. तसेच हा संसर्गजन्य आजार असल्याने त्याचा फैलावदेखील होतो आणि अन्य लोकांनादेखील त्याची लागण होण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा रुग्णांना आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवावे लागते.

वास्तविक, कांजिण्या होऊ नयेत, यासाठीचे लसीकरण लहानपणीच केले जाते. मात्र, त्यानंतरही हा आजार होण्याची शक्यता काही प्रमाणात असते. स्वच्छतेच्या अभावामुळे हा आजार होण्याची शक्यता अधिक असते. आपण काही प्रमाणात खबरदारी घेतल्यास या आजारापासून बचाव होऊ शकतो.

कांजिण्यांचा फैलाव कसा होतो?

कांजिण्या हा व्हेरिसला जोस्टर नावाच्या व्हायरसने पसरतो. त्याचे विषाणू पीडित नागरिकांच्या शरीरातील फुफ्फुसापर्यंत पोहोचतात. लक्षात ठेवा, हवा आणि खोकल्याच्या माध्यमातून हा आजार एका व्यक्तीकडून दुसर्‍या व्यक्तीकडे जातो. विशेषत: लहान मुलांना अशा प्रकारचा आजाराची लागण चटकन होते. कारण, त्यांची प्रतिकार क्षमता तुलनेने कमी असते. म्हणून मुलांना आजार होऊ नये, यासाठी पालकांनी खबरदारी घ्यायला हवी. मुलांना लहान वयात कांजिण्या आल्या नसतील, तर मोठेपणी कांजिण्या येण्याची शक्यता असते.
कांजिण्या पीडित मुलांना घराबाहेर नेण्याचे टाळावे. या खबरदारीमुळे कांजिण्यांचा फैलाव होणार नाही. रुग्णाजवळचा परिसर स्वच्छ ठेवण्याबाबत आग्रही असावे. त्याचे कपडे स्वतंत्रपणे धुवावेत. दररोज कपडे बदलावेत, जेणेकरून आजाराची तीव्रता लवकरात लवकर कमी होईल.

कांजिण्यांची लक्षणे : कांजिण्या हा एक व्हायरल इन्फेक्शनने होणारा आजार आहे. हा पाण्याच्या माध्यमातून पसरतो. पीडित व्यक्तीने तंदुरुस्त व्यक्तीला स्पर्श केल्यानंतरही हा आजार पसरतो. अतिउष्ण भागातील रुग्णांच्या शरीरावर लहान पुरळ येतात आणि त्यानंतर संपूर्ण भागात ते पुरळ दिसू लागतात. कालांतराने त्याचे रूपांतर काळ्या डागात होते. त्यातून ताप, डोकेदुखी, कोरडा खोकला येतो. अशा प्रकारची लक्षणे दिसताच तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधावा.

वैद्यकीय सल्ल्यानुसार जन्मापासून 13 वर्षांपर्यंत कधीही कांजिण्या न झालेल्या व्यक्तीस अतितीव्र स्वरूपात कांजिण्या होऊ नयेत, म्हणून लसीकरणाचा सल्ला देण्यात येतो.

दाट लोकवस्तीमुळे कांजिण्यांच्या संक्रमणाला चालना

कांजिण्यांचा कालावधी 7 ते 21 दिवसांपर्यंत असतो. कांजिण्यामध्ये फोडासारखे पुरळ, ताप, अस्वस्थपणा ही लक्षणे दिसून येतात. फोड प्रथम पाठीवर व पोटावर येतात. नंतर तोंडावर, हातांवर आणि पायांवर येतात. मात्र, तेथे ते कमी प्रमाणात येतात. रुग्णांच्या अंगाला खाज येते. तसेच अंगावरील पुरळ खाली बसण्यास 7 ते 8 दिवस लागतात. पुरळ येण्यापूर्वी 1-2 दिवस आणि पुरळ उठल्यानंतर 4-5 दिवस याचा संसर्गजन्य काळ असतो.

ज्या रुग्णांची प्रतिकारशक्ती कमी प्रमाणात असते, त्या रुग्णांमध्ये कांजिण्यांमुळे न्यूमोनिया, मेंदुज्वर होण्याची शक्यता असते. कांजिण्या एकदा येऊन गेल्या की, त्या कायमस्वरूपी प्रतिकारशक्ती देतात. दुसर्‍यांदा कांजिण्या होण्याची शक्यता क्वचितच असते. कांजिण्या येऊन गेलेल्या 10 टक्के रुग्णांना 'हर्पिस झोस्टर'ची (नागीण) बाधा होऊ शकते.

रूग्णांची काळजी

कांजिण्यांसाठी विशिष्ट असा उपचार नाही. नेहमीच्या लक्षणानुसार उपाय आहेत. पुरळ उठल्यानंतर रुग्णांना 6 दिवस वेगळे ठेवणे, नाक व घसा यांतील उत्सर्जनामुळे खराब झालेल्या वस्तू निर्जंतुक करणे. लक्षणानुसार औषधोपचार देणे याचा त्यात समावेश आहे. रुग्णांचे रुमाल, टॉवेल आणि संसर्गित वस्तू यांचा वापर इतर व्यक्तींनी टाळावा, त्वरित डॉक्टरांकडून औषधोपचार करणे, घर व परिसर स्वच्छ ठेवणे, वैयक्तिक स्वच्छता ठेवणे. तीव्र स्वरूपाच्या कांजिण्या आल्यास रुग्णांना तसेच गर्भवती महिलांना रुग्णालयात दाखल करावे. लक्षणानुसार, ताप, शरीराची खाज व दुय्यम जंतुसंसर्ग टाळण्यासाठी औषधोपचार करावेत.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news