कोल्हापूर; आशिष शिंदे : ज्या वाघनखांच्या साहाय्याने छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफजलखानाचा वध केला ती ऐतिहासिक वाघनखे मराठा साम्राज्याची राजधानी असलेल्या करवीरनगरीत तमाम कोल्हापूरकरांना पाहता येणार आहेत. लक्ष्मी-विलास पॅलेस या राजर्षी शाहू छत्रपती यांच्या जन्मस्थळी ही वाघनखे लवकरच पाहण्यासाठी ठेवली जाणार आहेत. 'शिवशस्त्रशौर्य' असे या प्रदर्शनाला नाव देण्यात आले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांनी वापरलेली वाघनखे लंडनमधील व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम येथे जतन करण्यात आली आहेत. ही वाघनखे सर्वसामान्यांच्या दर्शनाकरिता तीन वर्षांच्या कालावधीसाठी भारताला देण्यास व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमने संमती दिली आहे. ही वाघनखे महाराष्ट्रातील चार संग्रहालयांमध्ये ठेवण्यात येणार आहेत.
ही वाघनखे प्रदर्शित करणे, त्याची सुरक्षा तसेच त्याचा प्रवास हा अतिशय जोखमीचा व जबाबदारीचा आहे. प्रदर्शनाच्या अनुषंगाने प्रदर्शनाची व्यवस्था, सुरक्षेच्या अनुषंगाने राज्य सरकारच्या वतीने सांस्कृतिक कार्य विभागाच्या प्रधान सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे. या समितीमध्ये पोलिस महासंचालक, सीमा शुल्क आयुक्त, कोल्हापूर, सातारा येथील जिल्हाधिकारी, पोलिस निरीक्षकांसह अन्य सदस्यांचा समावेश आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील अनेक प्रसंग समस्त जनतेला कायम प्रेरणादायी आहेत. सन 1659 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफजलखानाने केलेल्या हल्ल्यास प्रत्युत्तर म्हणून ही वाघनखे वापरून खानाचा वध केला होता, तीच ही वाघनखे तीन वर्षांसाठी भारतात आणण्यात येणार असल्याचे राज्य सरकारने आपल्या आदेशात म्हटले आहे.