शिवराज्याभिषेक दिन सोहळ्यासाठी रायगड गजबजला

शिवराज्याभिषेक दिन
शिवराज्याभिषेक दिन

किल्ले रायगड, इलियास ढोकले : छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350 व्या शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याचा मुख्य कार्यक्रम शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजता किल्ले रायगडावर होत आहे. येथे उभारलेल्या राजदरबारात मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा होणार आहे. सोहळ्याचा प्रारंभ गुरुवारी चांदीच्या शिवमूर्तीची विधिवत खजूरतुला करून करण्यात आला.

शुक्रवारच्या सोहळ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री जी. किशन रेड्डी, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, उद्योगमंत्री तथा रायगडचे पालकमंत्री उदय सामंत, रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष संभाजीराजे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. गडावरील हासोहळा 'याची देही याची डोळा' अनुभवण्यासाठी राज्यभरातून शिवभक्त कालपासूनच गडावर दाखल झाले आहेत. शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजता मुख्य सोहळा सुरू होणार आहे.

दरम्यान, शिवमूर्तीची खजूरतुला करण्यात आली. त्यावेळी झालेल्या नगारा वादन आणि खालू बाजाच्या गजराने किल्ले रायगड दणाणून गेला. उपस्थित शिवभक्तांनी छत्रपती शिवरायांचा गजर केला. त्यामुळे गडावर उत्साह आणि चैतन्याचे वातावरण निर्माण झाले.

रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे, रायगड जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, रायगड जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे, महाडच्या प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड, कोकणकडा मित्र मंडळाचे अध्यक्ष सुरेश पवार, श्री शिवाजी रायगड स्मारक समिती अध्यक्ष राघूजी राजे आंग्रे, शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती अध्यक्ष सुनील पवार, अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिती दुर्गराज रायगड अध्यक्ष फत्तेसिंह सावंत आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोकणकडा मित्र मंडळ, श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती, दुर्गराज रायगड व श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने दिवसभर सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. तसेच पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्यावतीनेही विविध कार्यक्रम होणार असून, 6 जून पर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news