शिवजयंती विशेष : शिवरायांच्या मानसशास्त्रीय आघातामुळे औरंगजेब भुईसपाट!

शिवजयंती विशेष : शिवरायांच्या मानसशास्त्रीय आघातामुळे औरंगजेब भुईसपाट!

कोल्हापूर :  छत्रपती शिवरायांनी आग्रा येथे बादशहा औरंगजेबाच्या दरबारात जाऊन त्याचा आणि त्याच्या सरदारांचा जो काही पाणउतारा केला, जो काही अपमान केला, तो शिवरायांच्या मानसशास्त्रीय अभ्यासाचा उत्कृष्ठ नमुना समजायला हवा. कारण, शिवरायांनी औरंगजेबावर केलेला हा मानसशास्त्रीय आघातच शेवटी त्याचे थडगे महाराष्ट्रात बांधायला कारणीभूत ठरला. हा मानसिक आघात औरंगजेब बादशहा मरेपर्यंत विसरला नव्हता, हे विशेष!

मिर्झाराजे जयसिंहाबरोबर झालेल्या तहानंतर आणि तहामध्ये ठरल्यानुसार शिवाजी महाराज 5 मार्च 1666 रोजी रायगडाहून आग्रा येथे औरंगजेबाच्या भेटीसाठी रवाना झाले. जयसिंहांनी शिवाजी महाराजांना एक गोष्ट सांगितली होती, ती म्हणजे कदाचित औरंगजेबाच्या भेटीनंतर बादशहा शिवाजी महाराजांना आपला दख्खनचा प्रतिनिधी बनवेल. मात्र, औरंगजेबानं अशा प्रकारचा कोणताही शब्द दिलेला नव्हता.

औरंगजेब एवढा धुर्त आणि कावेबाज होता की, काहीही करून त्याला शिवाजी महाराजांना आग्रा येथे बोलावून ठार मारायचेच होते. त्यामुळे त्याने काही बहाणेही केले होते. आग्रा प्रवासादरम्यान औरंगजेबाने शिवाजी महाराजांना एक पत्रही पाठविले होते. या पत्रात असे म्हटले होते की, आपण इथे कोणत्याही संकोचाविना यावं, मनात कोणतीही चिंता बाळगू नये. मला भेटल्यावर तुम्हाला शाही सन्मान मिळेल आणि घरी परतू दिलं जाईल. तुमच्या सेवेसाठी शाही पोशाख पाठवत आहे. यावरून औरंगजेब शिवाजी महाराजांना गाफील ठेवण्याचा प्रयत्न करीत होता ते दिसून येते. जवळपास दोन महिन्यांचा प्रवास करून शिवाजी महाराज 9 मे 1666 रोजी आग्रा इथे पोहोचले. या प्रवासादरम्यान शिवरायांनी औरंगजेबाविषयी खडा न् खडा माहिती मिळविली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. 12 मे रोजी शिवरायांची औरंगजेबाशी भेट ठरवण्यात आली. मात्र, शिवराय औरंगजेबाच्या दरबारात येताच औरंगजेबाने खरे रंग दाखवायला सुरुवात केली. त्याने शिवरायांना पंचहजारी मनसबदारांच्या रांगेत उभे करून त्यांचा अपमान करण्याचा प्रयत्न केला. मग मात्र शिवरायांच्या रागाचा पारा चढला आणि शिवराय कडाडले, माझा सात वर्षांचा मुलगा आणि माझे नोकर-चाकरही पंचहजारी मनसबदार आहेत. माझ्या पुढच्या रांगेत उभारलेला राय सिंह हा तर जयसिंहांचा एक लहानसा नोकर आहे, मला त्यांच्या रांगेत का ठेवलंय? आलमगीरनामा या पुस्तकात मोहम्मद काझिम याने लिहून ठेवले आहे की, अपमानामुळे क्रोधित झालेले शिवाजी महाराज रामसिंहाशी मोठ्याने बोलू लागले, दरबारचा नियम मोडू नये, म्हणून रामसिंह शिवाजी महाराजांना शांत करण्याचा प्रयत्न करू लागले. मात्र, त्यांना यश आलं नाही.

शिवाजी महाराजांचा मोठा आवाज ऐकून हा काय गोंधळ आहे, असं औरंगजेबानं विचारलं. त्यावर राम सिंहाने दख्खनवरून आलेल्या या राजास शाही दरबाराचे नियम-कायदे माहिती नाहीत, असे सांगितले. त्यावर औरंगजेब बादशहाने शिवाजी महाराजांना त्यांच्या निवासस्थळी पोहोचवा, असे आदेश दिले. वास्तविक पाहता हा शिवरायांचा केवळ राग नव्हता, तर तो हिंदुस्थानच्या बादशहावर केलेला एक मानसशास्त्रीय आघात होता. ज्या बादशहाच्या दरबारात कुणाची मान वर करून बघायची किंवा बोलायची हिम्मत नव्हती, त्याच दरबारात शिवाजी महाराजांनी मोठ्या आवाजात सरदारांचा आणि बादशहाचाच पाणउतारा केला होता. एखाद्या राजाचा त्याच्याच दरबारात आणि तोही भरदरबारात केलेला अपमान हा त्या राजाच्या मृत्यूसमान असतो. समोरच्याला मानसिकद़ृष्ट्या खच्ची करण्यासाठी वापरण्यात येणारा हा प्रकार आहे.

यानंतर शिवाजी महाराजांनी अशाच वेगवेगळ्या मानसशास्त्रीय क्लृप्त्या वापरून त्यांच्यावरील पहारेदारांना आणि दस्तूरखुद्द बादशहालाही गाफील ठेवले आणि बादशहाच्या या नजरकैदेतून दिवसाढवळ्या त्याच्या आणि त्याच्या हजारो सैनिकांच्या हातावर तुरी देऊन पसार झाले. शहाजी महाराजांनी शिवरायांना इंगित जाणण्याची जी मानसशास्त्रीय कला शिकविली होती, ती शिवरायांनी इथे उपयोगात आणलेली दिसते. शिवरायांनी भरदरबारात औरंगजेबावर केलेला हा मानसशास्त्रीय आघात औरंगजेब आयुष्यभर विसरू शकला नाही. त्या सुडाग्नीपोटीच शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर तो मराठा साम्राज्य नामशेष करण्यासाठी महाराष्ट्रात जातीनिशी आला आणि इथेच गाडला गेला. औरंगजेबाने आपल्या मृत्युपत्रात लिहून ठेवले आहे की, माझ्या निष्काळजीपणामुळे शिवाजी माझ्या नजरकैदेतून पळाला आणि माझ्या जीवनाच्या अखेरपर्यंत मला मराठ्यांशी झगडावं लागलं. एका क्षणात जगाची उलथापालथ होऊ शकते, त्यामुळे गाफील राहू नका, अशा सूचना त्याने केल्या आहेत. 1666 साली शिवाजी महाराज आग्य्राच्या कैदेतून सुटले आणि 1707 साली औरंगजेबाचा मृत्यू झाला. ही चाळीस वर्षे त्याच्या मनाला शेवटपर्यंत डाचत होती.
(संदर्भ : शिवाजी अँड हिज टाइम्स-यदुनाथ सरकार, छत्रपती शिवाजी-सेतूमाधवराव पगडी, आलमगीरनामा-मोहम्मद काझिम)

शिवरायांना होते कित्येक कला-विद्यांचे ज्ञान!

शहाजीराजांनी अगदी लहाणपणापासून शिवरायांना वेगवेगळ्या कला किंवा विद्यांमध्ये पारंगत करण्यासाठी पद्धतशीर व्यवस्था केली होती. शिवरायांना वेगवेगळ्या कला शिकविण्यासाठी किंवा वेगवेगळ्या प्रकाराचे ज्ञान देण्यासाठी शहाजीराजांनी तीसहून अधिक शिक्षकांची नेमणूक केली होती. हे शिक्षक आपापल्या कला किंवा ज्ञानशाखेत अतिशय निपूण होते. युद्धकला, संभाषणकला, वेशांतरकला यासह दुसर्‍याच्या मनातील इंगित (हेतू) जाण्याची कला आदींचा यामध्ये समावेश होता. इतिहासात कुठे या शिक्षकांचा नामोल्लेख आढळून येत नसला, तरी त्यांची कामगिरी नमूद केलेली दिसते. दुसर्‍याच्या मनातील इंगित जाणण्याची ही जी काही कला होती, ती शिवरायांना अनेक ठिकाणी कामी आलेली दिसते. शिवरायांनी आग्य्राहून सुटका करून घेताना याच इंगित जाणण्याच्या किंवा मानसशास्त्रीय अभ्यासाचा उपयोग करून घेतलेला दिसतो. शिवरायांच्या जडण घडणीत शहाजीराजांचे योगदान फार मोलाचे आहे.

– इंद्रजित सावंत, ज्येष्ठ इतिहास तज्ज्ञ

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news