Cheteshwar Pujara : पुजाराच्या बॅटचा कहर! सलग चौथ्या सामन्यात शतक

Cheteshwar Pujara : पुजाराच्या बॅटचा कहर! सलग चौथ्या सामन्यात शतक
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : चेतेश्वर पुजाराने (cheteshwar pujara) आपल्या बॅटने कौंटी क्रिकेटमध्ये कहर केला आहे. सलग चौथ्या सामन्यातही पुजाराने शानदार फलंदाजी करत शतक झळकावले. ससेक्सकडून खेळताना पुजाराने मिडलसेक्सच्या गोलंदाजांना घाम फोडला. सामन्याच्या दुसऱ्या डावात त्याने ही खेळी साकारली.

पुजाराने (cheteshwar pujara) हे शतक कौंटी चॅम्पियनशिप डिव्हिजन 2 च्या सामन्यात केले आहे. या मोसमात त्याने सातत्यपूर्ण धावा केल्या आहेत. गेल्या सामन्यातही त्याने द्विशतक झळकावले होते. आतापर्यंत त्याने या काऊंटी हंगामात ससेक्सकडून खेळताना चार शतके झळकावली आहेत, ज्यामध्ये दोन द्विशतकांचा समावेश आहे.

दरम्यान, या सामन्यात पुजाराने (cheteshwar pujara) पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीच्या चेंडूवर षटकार ठोकून चाहत्यांची मने जिंकली. शाहीनच्या चेंडूवर अप्पर कट मारत पुजाराने चेंडू सीमापार पाठवला.

सामन्याच्या तिसऱ्या दिवशी ससेक्स संघ दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी उतरला. संघाने केवळ 6 धावांत दोन विकेट गमावल्या. अशा स्थितीत चेतेश्वर पुजारा चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला. डावाच्या तिसऱ्या षटकात शाहीन आफ्रिदी पुजाराच्या समोर आला. षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर, शाहीनने एक उसळता चेंडू टाकला, ज्यावर पुजाराने गोलंदाजाच्या वेगाचा वापर करून अप्पर कट मारला. चेंडूचा वेग इतका होता की तो थेट सीमारेषापार पोहोचला.

पुजाराने फटकावलेल्या षटकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. चाहते या शॉटचे जोरदार कौतुक करत आहेत. शाहीनने पुजाराने षटकार मारण्यापूर्वी एक विकेट घेतली होती. व्हिडिओ पाहिल्यानंतर एका यूजरने लिहिले- दिल जीत लिया पुजी पाजी… तर दुसऱ्या यूजरने लिहिले- शाहीनच्या बॉलवर पुजाराने किती शानदार शॉट मारला.

दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर भारतीय संघासोबत गेल्यानंतर तेथील मैदानावर पुजाराची बॅट काही खास कामगिरी करू शकली नाही. त्या दौ-यात पुजारा फ्लॉप ठरला होता. त्यानंतर श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत त्याला संघातूनही वगळण्यात आले. यानंतर तो राणजी ट्रॉफीमध्ये खेळला. तेथे पहिला टप्पा खेळल्यानंतर पुजाराने कौंटी क्रिकेटकडे वळण्याचा निर्णय घेतला आणि तेथे त्याची बॅट जोरदार चालली. इंग्लंडच्या मैदानांवर सध्या तो त्याच्या सर्वोत्तम फॉर्ममध्ये दिसत आहे. आयपीएलनंतर भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. तिथे टीम इंडियाला एक सामना खेळायचा आहे. अशा परिस्थितीत पुजाराचा त्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघात समावेश केला जाऊ शकतो.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news