कोल्हापूर : लोकसभेसाठी लंगोट कोण बांधणार?

कोल्हापूर : लोकसभेसाठी लंगोट कोण बांधणार?

कोल्हापूर ; राजेंद्र जोशी : लोकसभा निवडणुकीनंतर सुरू झालेला कोरोना काळ आणि राज्यातील सत्तानाट्यामुळे लोकसभेत विरोधी बाकावर बसण्याची आलेली वेळ यामुळे कोल्हापूरच्या दोन्ही खासदारांना मतदारसंघावर अपेक्षित प्रभाव पाडणे शक्य झाले नाही. तथापि, राज्यात बदललेल्या राजकीय समीकरणामुळे या दोन्ही जागांवर सध्या तरी त्यांचे स्थान अधिक बळकट होण्यास मदत झाली आहे. साहजिकच आगामी लोकसभा निवडणुकीत या विद्यमान खासदारांविरुद्ध लढण्यासाठी लंगोट कोण चढविणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

कोल्हापूर मतदारसंघात प्रतिस्पर्धीच भाजपच्या गोटात

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात तर प्रतिस्पर्ध्यालाच भाजपने आपल्या गोटात नेल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडे उमेदवाराचीच वानवा दिसते आहे. या स्थितीत स्वतःच्या बाळराजेंना कागलच्या गादीवर बसविण्याची तयारी करून मुश्रीफांना लंगोट चढवून लोेकसभेच्या रिंगणात कडव्या झुंजीची तयारी करावी लागेल, असे प्राथमिक चित्र आहे.

गत लोकसभा निवडणुकीमध्ये जिल्ह्यात शिवसेनेचे दोन्ही खासदार निवडून आले. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार धनंजय महाडिक यांना पराभूत करून मंडलिकांनी दिल्ली गाठली. तेव्हा कागलमधील राष्ट्रवादीचा एक गट मंडलिकांच्या पाठीशी होता आणि सेना-भाजप युतीमुळे मोदींच्या करिष्म्याचा मोठा वाटाही मंडलिकांच्या यशास कारणीभूत होता.

मंडलिक, माने यांच्या विरोधात मातब्बर मल्ल कोण?

हातकणंगले मतदारसंघात इचलकरंजीकरांना वळविण्याची भाजपची खेळी जशी यशस्वी ठरली, तसे प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीने मिळविलेल्या मोठ्या मतांमुळे काम आणि लोकप्रियता असूनही स्वाभिमानीच्या राजू शेट्टींवर पराभूत होण्याची वेळ आली. त्याला शेट्टींची काही वादग्रस्त वक्तव्येही कारणीभूत ठरली, हा भाग निराळा. पण याचा अर्थ हे दोन्ही खासदार केवळ स्वतःच्या लोकप्रियतेवर निवडून आले, असे अनुमान काढणे जसे कठीण होते, तसे युतीमधून निवडून येऊन महाआघाडीच्या बाकावर बसण्याची वेळ आल्याने या दोन्ही खासदारांची वाट खडतर बनली होती. पण राज्यातल्या नव्या सत्तांतराने, शिवेसनेतील बंडाने हे दोन्ही खासदार सध्याच्या स्थितीत तरी सेफ झोनमध्ये आहेत. प्रश्न उरतो, त्यांच्याविरुद्ध लढण्यासाठी मातब्बर मल्ल कोण?

भाजप सांभाळणार मंडलिकांच्या प्रचाराची सुत्रे?

लोकसभा निवडणुकीनंतर जिल्ह्याच्या राजकारणात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. धनंजय महाडिकांनी राष्ट्रवादी सोडली. अमल महाडिकांना कोल्हापूर दक्षिणमध्ये पराभव पत्करावा लागला आणि महादेवराव महाडिकांना गोकुळ सोडावे लागले. या बदलत्या राजकारणात महाडिक गट एकाकी पडला होता. महाडिक-मुश्रीफ या दोन गटांमध्ये उत्तरोत्तर अंतर वाढत होते. या स्थितीत कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात पुन्हा मंडलिकांविरुद्ध लढण्यासाठी भाजप धनंजय महाडिकांना रिंगणात उतरवेल, अशी अटकळ बांधण्यात आली. त्यादृष्टीने चाचपणीही सुरू होती.

पण राज्यसभेची संधी चालून येताच धनंजय महाडिकांना भाजपाने राज्यसभेवर पाठविले. यामुळे भाजपतर्फे कागलचे समरजितसिंह घाटगे यांच्या पाठीवर लोकसभेच्या झुंजीसाठी तांबडी माती टाकली जाईल, असे वातावरण असतानाच राज्यात नव्या सत्तांतराचा शंख फुंकला गेला आहे. आता ज्यांच्या विरुद्ध उमेदवार लढविण्याची तयारी भाजप करीत होते, त्यांच्या प्रचाराची सूत्रे स्वीकारण्याची वेळ भाजपवर येणार आहे.

धैर्यशील माने यांनी राजकीय टायमिंग साधले!

हातकणंगले मतदारसंघात राजू शेट्टी यांनी गेल्या अडीच वर्षांत अनेक आंदोलने करून मतदारसंघ पिंजून काढला होता. एका विशिष्ट वळणावर त्यांनी महाआघाडीची साथही सोडली. पण त्यांच्या राजकारणाचा लंबक भाजपकडे वळण्यापूर्वीच योग्य टायमिंग साधत, धैर्यशील माने शिंदे गटात दाखल झाले. आता आवाडे गटाचा कल भाजपकडे झुकल्याने इचलकरंजी विधानसभेत माने कागदावर तरी पुढे दिसतात. राजेंद्र यड्रावकर शिंदे गटात गेल्यामुळे शिरोळमध्ये त्यांची मदत होऊ शकते. शाहूवाडी-पन्हाळ्यात विनय कोरे त्यांना सहाय्यभूत ठरू शकतात. या शिदोरीवर राजू शेट्टींचा कडवा संघर्ष अधिक कडवा होणार आहे. अर्थात नव्या सत्तांतराच्या पार्श्वभूमीवर जरी हे भाष्य असले, तरी लोकशाहीमध्ये मतदारराजा हा सर्वश्रेष्ठ असतो आणि त्याच्या मनात काय चालले आहे, ते कळण्यासाठी किमान दोन वर्षांची प्रतिक्षा करावी लागेल.

कट्टर विरोधक एकाच जाजमावर

राजकारणाचा सारिपाट कसा बदलतो, याचे हे नमुनेदार उदाहरण आहे. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात राधानगरी, भुदरगडमध्ये आ. आबिटकर हे शिंदे गटात गेले आहेत. चंदगडमध्ये मंडलिकांचे मेहुण्या-पाहुण्याचे सख्य आहे. कोल्हापूर उत्तरमध्ये मंडलिकांबरोबर विळ्या-भोपळ्याचे सख्य असलेले राजेश क्षीरसागर यांना मंडलिकांच्या प्रचाराची सूत्रे हाती घ्यावी लागतील. कागलमध्ये घाटगे गट मंडलिकांना मदत करू शकतो आणि दक्षिणमध्ये महाडिकांचे पाठबळ त्यांना मिळू शकते. या कागदावर भक्कम वाटणार्‍या राजकारणात मंडलिकांविरुद्ध लढण्यासाठी राष्ट्रवादीकडे तुल्यबळ उमेदवार कोण, याचे एकमेव उत्तर विद्यमान आमदार हसन मुश्रीफ हेच येते. कारण संभाजीराजेंनी कोणत्याही पक्षाला कमिटमेंट न देता, आपल्या स्वतःच्या पक्षाद्वारे 'एकला चलो रे…' अशी वाटचाल सुरू केली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news