बदलत्या हवामानाचे रब्बी उत्पादनावर चिंतेचे सावट!

बदलत्या हवामानाचे रब्बी उत्पादनावर चिंतेचे सावट!

कोल्हापूर, राजेंद्र जोशी : हवामानातील तीव्र चढउतार आणि अवकाळी बरोबरच काही ठिकाणी ढगफुटी सद़ृश्य पाऊस झाल्यामुळे देशातील रब्बी हंगामाच्या उत्पादनावर संकटाची छाया पसरली आहे. पर्यावरणातील या बदलाचा मोठा फटका उत्तरेकडील राज्यांना बसला आहे. परिणामी उत्पादनात घट होऊन शेतकर्‍याला त्याची झळ सोसावी लागेल, असे सध्याचे चित्र आहे.

रब्बी हंगामात देशात मोठे धान्योत्पादन होते. हिवाळी पिकामधील 70 टक्के पीक या हंगामात तयार होते. केंद्र सरकारने प्रसिद्ध केलेल्या अन्नधान्य उत्पादनाच्या दुसर्‍या अंदाजामध्ये गव्हाच्या उत्पादनाबरोबर त्याच्या गुणवत्तेवरही परिणाम होण्याची शक्यता वर्तवली आहे. मोहरीचे उत्पादन 3 ते 4 टक्क्यांनी घसरेल, असा अंदाज आहे. तर गव्हाच्या उत्पादनात गतवर्षीच्या प्रती एकर 20 ते 22 क्विंटल उत्पादनाच्या तुलनेत 14 ते 15 क्विंटल उत्पादन हाती येईल, असा अंदाज आहे. पावसाच्या या अनपेक्षित कोसळण्यामुळे तेल बियांच्या उत्पादनामध्ये 7 ते 8 टक्के घसरण आहे. यामुळे व्यापार्‍यांकडून उत्पादकाला आर्थिक फटका सहन करावा लागेल, शिवाय गव्हाच्या कापणी हंगामावेळी जर पावसाने दगा दिला तर हे उत्पादन आणखी खाली येऊ शकते. साहजिकच मोहरी आणि गहू या दोन पिकांच्या उत्पादकांमध्ये उत्पादन खर्च निघेल की नाही असे चिंतेचे वातावरण आहे.

चालू वर्षी हिवाळ्यातच हवामानाने आपल्या तीव्र बदलाचे रूप दाखविले होते. पंजाब, राजस्थान, हरियाणा आणि उत्तर प्रदेश या उत्तरीय राज्यांमध्ये अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला तर मध्यप्रदेश, गुजरात, बिहार या राज्यांमध्ये ढगफुटीने हजेरी लावली. उत्तरीय राज्यात अवकाळीने गव्हाच्या पिकाला धक्का दिला तर मध्य भारतामध्ये ढगफुटीने मोहरीवरील फुलाच्या प्रक्रियेला रोखून धरले. शिवाय डिसेंबर-जानेवारीमधील उत्तरेकडून येणार्‍या थंडीच्या लाटा उभरत्या पिकांना अडचणीत टाकण्यास भाग पाडल्या.

निसर्गावर सर्व काही अवलंबून

केंद्र सरकारच्या अंदाजानुसार यंदा देशाच्या रब्बी हंगामात गहू आणि मोहरीचे उत्पादन अनुक्रमे 112 दशलक्ष मे. टन आणि 12.8 दशलक्ष मे. टन इतके अपेक्षित आहे. गतवर्षी हे उत्पादन त्याहूनही कमी म्हणजे अनुक्रमे 107.7 दशलक्ष मे. टन आणि 9.11 दशलक्ष मे. टन इतके होते. रब्बी हंगामातील पिकांची सध्याची स्थिती असली तरी कापणीच्या हंगामापर्यंत निसर्ग कशी साथ देतो त्यावर उत्पादनाचे चित्र अवलंबून राहील.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news