पुणे : पेन्शन आणि बँकेच्या नियमात येत्या 1 फेब्रुवारीपासून बदल होत आहेत. त्यामुळे पेन्शन खात्यातून एकाच वेळी 25 टक्क्यांपेक्षा जास्त रक्कम काढता येणार नाही, तर बँकेतून पैसे वर्ग करण्याची मर्यादा वाढणार असून, फास्टॅगच्या नियमातही बदल होणार आहे. येत्या 1 फेब्रुवारीला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन विद्यमान सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प मांडतील. लोकसभा निवडणुकीमुळे अंतरिम अर्थसंकल्प सादर होईल. याच दिवसापासून नागरिकांच्या आर्थिक बाबींशी निगडित नियमांमध्येही बदल होत आहे. पेन्शन फंड – पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरणाने (पीएफआरडीए) नॅशनल पेन्शन सिस्टिम फंडाच्या खात्यातून 25 टक्क्यांपेक्षा जास्त रक्कम काढता येणार नाही. संपूर्ण कालावधीत तीनदा रक्कम काढता येईल.
त्यात घर, उच्च शिक्षण आणि दुर्धर आजारांवरील उपचारासाठी पैसे काढता येतील. गृह कर्जावर सवलत… स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) गृह कर्जावर 0.65 टक्क्यांपर्यंत सवलत देऊ केली आहे. प्रक्रिया शुल्क आणि गृहकर्जावरील ही सवलत 31 जानेवारी 2024 पर्यंत मिळेल. ही सूट फ्लेक्सी पे, एनआरआय, पारंपरिक, बिगरवेतनदारांना हा लाभ मिळेल. सिबिलनुसार कर्ज रक्कम ठरविली जाईल. फास्टॅगमध्ये होणार बदल नॅशनल हायवे अॅथोरिटी ऑफ इंडियाने (एनएचएआय) केवायसीशिवायचे फास्टॅग 31 जानेवारीनंतर निष्क्रिय करण्याची घोषणा केली आहे. अनेक वाहनांसाठी एकच फास्टॅग वापरण्याचा किंवा विशिष्ट वाहनाला अनेक फास्टॅग जोडले जात आहेत.
जवळपास सात कोटी फास्टॅग वितरित करण्यात आले असून, त्यातील 4 कोटी कार्यरत आहेत. जवळपास 1.2 कोटी फास्टॅग बनावट आहेत. या प्रकाराला आळा बसावा, यासाठी नियमात बदल करण्यात आला. सॉव्हरिन गोल्ड बाँड रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा (आरबीआय) 2023-24 च्या वर्षात सॉव्हरिन गोल्ड बाँडच्या गुंतवणुकीचा टप्पा 12 फेब्रुवारीला सुरू होईल, तर त्याची अंतिम मुदत 16 फेब्रुवारी असेल. या बाँडसाठी 6 हजार 199 रुपये प्रतिग्रॅम मूल्य ठरविण्यात आले आहे. पैसे वर्ग करण्याची मर्यादा वाढवली… फेब्रुवारीपासून बँक खात्यांमध्ये 5 लाख रुपये ट्रान्सफर करता येतील. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (एनपीसीआय) बँक खात्यातील व्यवहार अधिक जलद करण्यासाठी ही सुविधा देऊ केली आहे. प्राप्तकर्ता किंवा लाभार्थ्याचा फोन नंबर आणि बँक खात्याचे नाव टाकून पैसे पाठविणे शक्य होणार आहे.
हेही वाचा :