Chandrayaan-3 Mission : चांद्रयान-३ ने पृथ्वीची कक्षा सोडली; चंद्राच्या दिशेने प्रवास सुरू

Chandrayaan-3 Mission : चांद्रयान-३ ने पृथ्वीची कक्षा सोडली; चंद्राच्या दिशेने प्रवास सुरू
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : देशाचे तिसरे चंद्र मिशन 'चांद्रयान-३' अवकाशात झेपावल्यानंतर अख्ख्या देशाचं लक्ष या मोहिमेकडे लागून राहिले आहे. चांद्रयान-३ ने आज (दि.१) पृथ्वीभोवती प्रदक्षिणा पूर्ण करून पृथ्वीची कक्षा सोडली आणि चंद्राच्या दिशेने प्रवास सुरू केला आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने मंगळवारी (दि.१ जुलै) मध्यरात्री चांद्रयान-3 अंतराळयान ट्रान्सलुनर कक्षेत प्रक्षेपित केले. ५ ऑगस्टपर्यंत ते चंद्राच्या कक्षेत प्रवेश करणार आहे, असे इस्रोने म्हटले आहे.

आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील अंतराळ केंद्रातून १४ जुलैला 'चांद्रयान-३' अंतराळात प्रक्षेपित झाले. इस्रोच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारच्या ट्रान्स-लूनर इंजेक्शन (TLI) नंतर, चांद्रयान-3 अंतराळयान पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर पडले आणि सध्या ते चंद्राच्या जवळपास आहे. अवकाशयानाने आज चंद्राच्या दिशेने प्रवास सुरू केला आहे. लँडर २३ ऑगस्ट रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर लँडिंगचा प्रयत्न करेल.

चांद्रयान-3 चा आत्तापर्यंतचा घटनाक्रम

14 जुलै : चांद्रयान 36500 कि.मी. द 170 कि.मी.च्या कक्षेत प्रक्षेपित करण्यात आले.
15 जुलै : पहिल्यांदाच कक्षा 41762 कि.मी. द 173 कि.मी.पर्यंत वाढविण्यात आली.
17 जुलै : दुसर्‍यांदा ती 41603 कि.मी. द 226 कि.मी. वाढवण्यात आली.
18 जुलै : तिसर्‍यांदा 51400 कि.मी. द 228 कि.मी. अशी कक्षा वाढविण्यात आली.
20 जुलै : कक्षा चौथ्यांदा 71351 कि.मी. द 233 कि.मी.पर्यंत वाढवण्यात आली.
25 जुलै : पाचव्यांदा कक्षा वाढवण्यात येणार आहे. नंतर यान चंद्राच्या दिशेने जाईल.                                                                1ऑगस्ट:  चांद्रयान-३ चा पृथ्वीची कक्षा सोडून चंद्राच्या दिशेने प्रवास सुरू

५ ऑगस्टला यान चंद्राच्या कक्षेत

इस्रोच्या माहितीनुसार, ५ ऑगस्टला यान चंद्राच्या कक्षेत पोहोचेल. एकदा यानाने चंद्राच्या गुरुत्वाकर्षण क्षेत्रात प्रवेश केल्यावर, त्याची उंची हळूहळू कमी करण्यासाठी आणि चंद्राभोवती वर्तुळाकार कक्षेत प्रवेश करण्यासाठी कक्षा-कमी करणार्‍या युक्तीच्या मालिकेतून जाईल. तर २३ ऑगस्टला यानाला चंद्रावर लँड करण्याची योजना आहे.

चंद्रावर पाठवण्यासाठी LVM-3 लॉन्चरचा वापर

चांद्रयान-2 च्या मर्यादित यशाने खचून न जाता भारताने चांद्रयान-3 ही 700 कोटी रुपये खर्चाची महत्त्वाकांक्षी मोहीम हाती घेतली. या मोहिमेसाठी ६१५ कोटी रुपयांचे कोटींचे बजेट लागले आहे. हे मिशन जवळपास ५० दिवसांच्या यात्रेनंतर चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ लँडिंग करेल. यास चंद्रावर पाठवण्यासाठी LVM-3 लॉन्चरचा वापर करण्यात आला आहे.

चंद्रावर लँडिंग धोकादायक कारण…

मंगळ हा चंद्रापेक्षा पृथ्वीपासून कितीतरी लांब आहे, याउपर तेथे लँडिंग सोपे आहे. कारण मंगळावर वातावरण आहे. चंद्रावर लँडिंग कठीण यासाठी, की येथे वातावरण नाही. वातावरण नसल्याने चंद्रावर उतरण्यासाठी प्रॉपेलंटचा (प्रणोदक) वापर केला जातो. ते मर्यादित प्रमाणातच नेता येते. पृथ्वीवर जीपीएसच्या मदतीने लोकेशनची माहिती मिळते. चंद्रावर लोकेशन दाखविणारे सॅटेलाईट नाही. त्यामुळे लोकेशनही कळत नाही आणि पृष्ठभागापासूनचे अंतरही कळत नाही.

तीन आव्हाने

1) लँडरची चंद्राच्या पृष्ठभागावर सुरक्षित लँडिंग
2) चंद्राच्या पृष्ठभागावरून रोव्हर चालविणे
3) चंद्रावरील विविध घटकांचे वैज्ञानिक परीक्षण

चांद्रयान-3 चे महत्त्व काय?

  • चंद्राच्या अशा भागात लँडर उतरणार आहे, ज्याची काहीही माहिती आजवर उपलब्ध नाही.
  • चंद्रावरील सोने, प्लॅटिनियम, युरेनियम आदी खनिज संपत्तीचा शोध घेतला जाणार आहे.
  • अंतराळात चीनला प्रतिआव्हान देणे, या द़ृष्टिनेही ही मोहीम महत्त्वाची आहे.

पृथ्वीपासून चंद्राचे अंतर

  • 3.84 लाख कि.मी. आहे. ते पार करायला 45 ते 48 दिवस यानाला लागतील.
  • एलएमव्ही 3 ने यान पृथ्वीच्या कक्षेत पाठविले जाईल. ते पृथ्वीला प्रदक्षिणा घालेल आणि याबरोबरच आपल्या प्रदक्षिणेचा परिघ वाढवत राहील.
  • आणि यादरम्यान एका क्षणी ते चंद्राच्या कक्षेत प्रवेश करेल. चंद्राला प्रदक्षिणा घालणे सुरू करेल. लँडर आपला परीघ लहान करत करत एका क्षणी चंद्रावर लँडिंग करेल.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news