chandrayaan-3 | चंद्रावरील गूढ गोष्टींचा शोध सुरू, लँडर विक्रमने पाठविला व्हिडिओ

chandrayaan-3 | चंद्रावरील गूढ गोष्टींचा शोध सुरू, लँडर विक्रमने पाठविला व्हिडिओ
Published on
Updated on

बंगळूर, वृत्तसंस्था : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) चांद्रयान-3 मोहिमेअंतर्गत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील विश्वविक्रमी सॉफ्ट लँडिंगनंतर दोन तास 26 मिनिटांनी विक्रम लँडरमधून बाहेर पडलेले 'प्रज्ञान' रोव्हर चंद्रावर उतरले. त्याने विशिष्ट परिघात चंद्राच्या पृष्ठभागावरील आपला स्वतंत्र प्रवास सुरू केला आहे. रोव्हर कामाला लागले असून, चंद्रावरील गूढ गोष्टींचा शोध त्याने सुरू केला आहे. चंद्रावर काही सेकंदआधी उतरण्यापूर्वीचा लँडरने व्हिडीओ घेतला. हा व्हिडीओ इस्रोने सायंकाळी जारी केला.

प्रज्ञान वेगळे झालेले असले तरी विक्रमची नजर त्याच्यावर राहणार आहे. पुढील काळातही दोघे परस्परांच्या सान्निध्यातच राहतील. विक्रम लँडर बुधवारी सायंकाळी सहा वाजून चार मिनिटांनी चंद्रावर उतरले होते. यानंतर दोन तास 26 मिनिटांनी म्हणजेच रात्री 8.30 वाजता विक्रम लँडरच्या रॅम्पवरून प्रज्ञान रोव्हरही चंद्रावर उतरले.

या महाविक्रमी यशानंतर, लँडरमधून रोव्हर बाहेर पडायला किती वेळ लागेल, हे आताच सांगता यायचे नाही. कदाचित त्यासाठी दिवसही जावा लागू शकतो, असे इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले होते,
लँडिंगनंतर प्रत्यक्षात मात्र त्यासाठी फार वेळ लागला नाही.

प्रज्ञान रोव्हर कोण, काय करेल?

प्रज्ञान रोव्हर हा 6 चाकांचा एक रोबो असून, तो चंद्राच्या पृष्ठभागावर चालत राहणार आहे. चंद्रावरील मातीचे, मातीतील खनिजांचे, रासायनिक घटकांचे विश्लेषण करणार आहे.

चंद्रावर उमटला अमीट अशोकस्तंभ?

प्रज्ञान रोव्हरच्या चाकांनी चंद्रावर अशोकस्तंभाची छाप उमटविल्याची छायाचित्रे सोशल मीडियातून मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. प्रत्यक्षात मात्र असे कुठलेही छायाचित्र अद्याप इस्रोकडून जारी करण्यात आलेले नाही. चाकांतील अशोकस्तंभाचा शिक्का प्रज्ञान जसजसा चंद्राच्या पृष्ठभागावरून पुढे पुढे सरकत जाईल तसतसा उमटत जाईल. चंद्रावर भारताची ही कधीही न पुसली जाणारी छाप असेल. चंद्रावर वातावरण नाही. हवा नसल्याने धूळ उडत नाही. त्यामुळे भारताची ही छाप अमीट असेल, असेही सांगण्यात येत आहे. काही वृत्तसंस्थांच्या माहितीनुसार चंद्रावर भारताची अमीट स्मृती उमेटलही, पण ती जी काही असेल, ते इस्रो कदाचित नंतर जाहीर करेल.

प्रज्ञान रोव्हर सुरक्षित : इस्रो

चंद्राच्या पृष्ठभागावर उतरताच प्रज्ञानने सर्वांत आधी स्वत:चे सोलर पॅनल खुले केले. प्रज्ञान रोव्हरच्या यंत्रणा ठरल्याप्रमाणे काम सुरळीत सुरू आहेत. त्याचे पेलोड उत्तम पद्धतीने काम करत आहेत, असे इस्रोकडून सांगण्यात आले.

पंतप्रधान शनिवारी शास्त्रज्ञांना भेटणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शनिवारी बंगळूरला इस्रोच्या मुख्यालयातील शास्त्रज्ञांची भेट घेणार असून, चांद्रयान-3 च्या यशस्वी लँडिंगबद्दल त्यांचे अभिनंदन करणार आहेत.

17 सेकंदांच्या व्हिडीओत विवरे अन् राखाडी पृष्ठभाग

लँडर विक्रमने लँडिंगच्या आधीचा एक व्हिडीओही इस्रोकडे पाठविला आहे. हा व्हिडीओ इस्रोने गुरुवारी सायंकाळी जारी केला. व्हिडीओमध्ये चंद्राचे विहंगम दृश्य दिसत आहे. सतरा सेकंदांच्या या व्हिडीओमध्ये सुरुवातीला तरंगांसारखे दृश्य दिसते आणि नंतर लँडर जवळ पोहोचताच विवरेच विवरे दिसतात. चंद्राचा राखाडी पृष्ठभाग दिसत आहे.

दगड, विवरांतील घटकांचा रासायनिक विश्लेषणाद्वारे अभ्यास

'विक्रम'पासून वेगळे झालेल्या प्रज्ञान रोव्हरने चंद्राच्या दक्षिण ध्रुवाच्या पृष्ठभागावरून प्रवास सुरू केला आहे. रोव्हरच्या सहाय्याने 'इस्रो' या पृष्ठभागावरील महाकाय विवरांमध्ये गोठलेल्या बर्फाचे स्कॅनिंग करेल. ही छायाचित्रे तो 'इस्रो'ला पाठवेल. पृष्ठभागावरील दगड, माती, विवरे यांचा अभ्यास रासायनिक घटकांच्या विश्लेषणाद्वारे केला जाणार आहे. चंद्राच्या पृष्ठभागावरील टेकड्यांचे अचूक स्कॅनिंग करण्याचा प्रयत्न रोव्हर करणार आहे. अशा परिसराची छायाचित्रे काढण्याचे काम रोव्हरने सुरू केले आहे. विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर हे एक चंद्र दिवसासाठी (14 पृथ्वी दिवस) काम करणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news