चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा गणेश विसर्जनासाठी गेलेल्या तिघांचा गोसीखुर्द कालव्यात बुडून मृत्यू झाल्याची दुदैवी घटना चंद्रपूर जिल्ह्यातील सावली येथे गणेश विसर्जनावेळी घडली. मृतत्तामध्ये दोघा सख्ख्या भावाचा समावेश आहे. निकेश हरीभाऊ गुंडावार (वय ३१), संदीप हरिभाऊ गुंडावार (२७), सचिन (गुरू) दिवाकर मोहुर्ले असे मृतकांचे नाव आहे.
सावली शहरात विविध गणेश मंडळातर्फे गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. काल (शनिवार) गणेश विसर्जनाचा कार्यक्रम होता. सायंकाळ पासून शहरात विसर्जन रॅलीला सुरूवात झाली. सावलीत एकुण तीन सार्वजनिक गणेश मंडळ आहेत. दोन गणेश मंडळाने सावलीतील गाव तलावात विसर्जन केले. जय बजरंग गणेश मंडळाने आसोला मेंढ्यांच्या गोसीखुर्द कालव्यात विसर्जन करण्याचे ठरविले. मिरवणूक गोसीखुर्द कालव्यावर रात्री पर्यंत सुखरूप पोहोचली. कालव्यात गणेश विसर्जन होत असताना निकेश हरीभाऊ गुंडावार (३१) रा. चांदली बुज हा पाय घसरुन गोसीखुर्दच्या कालव्यात पडला. भावाला वाचविण्यासाठी संदीप हरिभाऊ गुंडावार (२७) याने कालव्यात उडी मारली. या दोन भावांना वाचविण्यासाठी सचिन (गुरू) दिवाकर मोहुर्ले रा. सावली याने कालव्यात उडी घेतली. या घटनेमध्ये तिघांचाही मृत्यू झाला.
सचिन( गुरू) दिवाकर मोहुर्ले यांचे शव रात्रीचं मिळाले. निकेश हरीभाऊ गुंडावार आणि संदिप हरीभाऊ गुंडावार या दोन सख्ख्या भावांचे शव अजून पर्यंत मिळाले नाहीत. शोध मोहीम सुरू आहे. तीन तरुणांचा मृत्यू झाल्यामुळे परिसरातील नागरिक हळहळ करीत आहे.
हेही वाचा :