Chandrapur Lok Sabha Election: चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात 67.57 टक्के टक्के मतदान; खरी लढत भाजप आणि काँग्रेसमध्ये

Chandrapur Lok Sabha Election
Chandrapur Lok Sabha Election
Published on
Updated on

चंद्रपूर, पुढारी वृत्तसेवा: चंद्रपूर वणी आर्णी लोकसभा क्षेत्रासाठी काल शुक्रवारी (दि.१९) निवडणूक पार पडली. सायंकाळी सहा वाजेपर्यंत 67.57 टक्के मतदान झाले. मतदानाच्या दिवशी जिल्ह्यात 43 अंश तापमान असताना शुध्दा मतदारांनी भरघोस प्रतिसाद देत मतदानाचे कर्तव्य पार पाडले. 2019 च्या तुलनेत 2024 च्या निवडणुकीत 3 टक्क्यांनी वाढ झाली आहे. भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार व काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांच्यामध्ये थेट लढत होत आहे. तर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राजेश बेले यांचे मते निर्णायक ठरणार असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. (Chandrapur Lok Sabha Election)

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात एकूण 18 लक्ष 37 हजार 906 मतदार आहे. यात 9 लक्ष 45 हजार 736 पुरुष मतदार, 8 लक्ष 92 हजार 122 स्त्री मतदार तर 48 इतर मतदार आहेत. यापैकी 6 लक्ष 58 हजार 400 पुरुष मतदारांनी (69.62 टक्के), 5 लक्ष 83 हजार 541 स्त्री मतदारांनी (65.41 टक्के) तर 11 इतर नागरिकांनी (22.92 टक्के) असे 12 लक्ष 41 हजार 952 (67.57 टक्के) नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. (Chandrapur Lok Sabha Election)

काल शुक्रवारी (दि.१९) सकाळी सात ते सहा वाजेपर्यंत मतदानाच्या एक दोन किरकोळ घटना वगळता मतदान शांततेत पार पडले. सकाळी सात वाजतापासून मतदानाला सुरूवात झाली. चंद्रपूर शहरासह जिल्ह्यात तापमान काल चाळीसीपार होते. परंतु सकाळच्या वेळेत मतदानाला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. (Chandrapur Lok Sabha Election)

सकाळी 9 वाजेपर्यंत पहिल्या दोन तासांत 7.44 टक्केच मतदान झाले. दुसऱ्या दोन तासात अकरा वाजेपर्यंत 18.94 टक्के, दुपारी एक वाजता 30.96 टक्के, दुपारी तीन वाजता पर्यंत 43.48 टक्के, सायंकाळी पाच वाजता पर्यंत 55.11 टक्के मतदान झाले. सायंकाळी सहा वाजेपर्यंत 67.57 टक्के मतदान झाले. शेवटच्या एका तासात 12.46 टक्क्यांमध्ये वाढ झाली. चंद्रपूर लोकसभा वणी आर्णी लोकसभा मतदारसंघात एकूण सहा विधानसभा क्षेत्राचा समावेश आहे. राजूरा विधानसभा संघ 70.09 टक्के, चंद्रपूर 58.43 टक्के, बल्लारपूर 68.36 टक्के, वरोरा 67.73 टक्के, वणी 73.24 टक्के तर आर्णी विधानसभा मतदारसंघात 69.52 टक्के मतदान झाले.

खरी लढत ही भाजप आणि काँग्रेसमध्ये

या लोकसभा क्षेत्रात भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार, काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर आणि वंचीत बहुजन आघाडीचे उमेदवार राजेश बेले यांच्यासह पंधरा उमेदवार उभे आहेत. परंतु खरी लढत ही भाजप आणि काँग्रेस यांच्यामध्ये आहे. भाजपचे सुधीर मुनगंटीवार आणि काँग्रेसचे प्रतिभा धानोरकर यांच्या मध्येच चुरशीचा सामना होणार असून दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते निवडून येण्याचा दावा करीत आहेत. मुनगंटीवार हे विद्यमान मंत्री आहेत तर धानोरकर विद्यमान आमदार आहेत. दोघांमध्ये खरी लढत असली तरी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राजेश बेले यांच्या भूमिकेकडे दुर्लक्ष करता येणार नाही.

मागील 2019 च्या निवडणूकीत वंचितचे राजेंद्र महाडोळे यांनी 112079 मते मिळविली होती. तर नोटाला 11377 मते मिळाली होती. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आणि नोटाला मिळणाऱ्या मताकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. 2019 च्या मोदी लाटेत 559507 मते बाळू उर्फ सुरेश धानोरकर यांना तर प्रतिस्पर्धी भाजपचे हंसराज अहिर यांना 514744 मते मिळाली होती. मोदीलाटेतही 44763 मताने बाळू धानोरकर यांनी अहिर यांचा पराभव करून राज्यात एकमेव जागा त्यांच्या रूपाने काँग्रेसला मिळाली होती.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news