उद्धव ठाकरेंना विरोधकांचा रोल जमतो, सत्ताधाऱ्यांचा नाही: चंद्रकांत पाटील

उद्धव ठाकरेंना विरोधकांचा रोल जमतो, सत्ताधाऱ्यांचा नाही: चंद्रकांत पाटील

पुणे, पुढारी वृत्तसेवा: सत्तेत असताना उद्धव ठाकरेंना सत्ताधाऱ्यांची भूमिका जमली नाही, आता त्यांना विरोधकाची भूमिका व्यवस्थित जमत आहे. तीच त्यांनी कायम पार पाडत राहावी, असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. पीएम स्व:निधी योजना आणि किसान कॅश कार्ड वाटप कार्यक्रमापूर्वी चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, आता ज्याप्रमाणे उद्धवजी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची भागदौड सुरू आहे, अशीच भागदौड त्यांनी सत्तेत असताना सुरू ठेवली असती, तर कदाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्यापासून दुरावले गेले नसते.

शरद पवारांना भेटायची संधी मिळाली असती तर आम्ही भेटलो असतो

नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रुग्णालयात जाऊन शरद पवार यांची भेट घेतली, याबाबत विविध चर्चांना उधाण आले आहे. यासंदर्भात बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, मुख्यमंत्री – शरद पवार यांच्या भेटीच्या अशा विविध प्रकारच्या चर्चा करण्यात काहीच अर्थ नाही, आम्हाला जर शरद पवार यांना भेटण्याची परवानगी असते तर आम्ही देखील त्यांना भेटलो असतो.

राष्ट्रवादीने शिर्डीच्या अधिवेशनात विधानसभा निवडणुकांकरिता मिशन 100 चे टार्गेट ठेवले आहे. त्यात काही वावगं नाही, डिपॉझिट जप्त होणारे छोटे-मोठे पक्ष देखील असे दावे करत असतात. भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना असे मिळून मिशन १७० नुसार विधानसभेत 170 जागा नक्कीच मिळवणार आहे, असे ते म्हणाले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news