पुढारी ऑनलाईन: पुणे बंगळुरू महामार्गावरील चांदणी चौकातील पूल येत्या रविवारी म्हणजेच दोन ऑक्टोबरला पाडण्यात येणार आहे. त्यावेळी किमान 12 ते 15 तास महामार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. त्याचा परिणाम कोल्हापूर ते मुंबईपर्यंतच्या महामार्गावरील वाहतुकीवर होणार आहे. महामार्ग शनिवार रात्री 11 ते रविवारी सकाळी 8 वाजेपर्यंत बंद असेल, त्याचवेळेत पूल पडला जाईल अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी आज दिली.
रविवारी रात्री दोन वाजता होणार ब्लास्ट करून हा पूल पाडण्यात येणार आहे. खबरदारीचा उपाय म्हणून 200 मीटर परिसर निर्मनुष्य केला जाणार आहे. ब्लास्टिंगसाठी परवानगी मिळाली आहे. यासाठी 600 किलो स्फोटके वापरली जाणार असून पाच ते सहा सेकंदांमध्ये पुल जमीनदोस्त होणार आहे.
एक ऑक्टोबर वाहतूक बंद केल्यानंतर दोन ऑक्टोबरला रविवारी पहाटे हा पूल पाडण्यात येईल. तसेच त्यानंतर आठ दहा तासातच तेथील राडारोडा उचलून महामार्गावरील वाहतूक पूर्ववत करण्यात येईल. दिवाळीपर्यंत दोन्ही बाजूला सेवा रस्ते पूर्ण करण्याचा निर्णय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने घेतला आहे. त्यामुळे दिवाळीपर्यंत या महामार्गावरील वाहतूक सुलभ आणि सुरळीत होईल. आणि येथे सध्या होत असलेली एक दोन तासाची कोंडी पूर्णपणे संपुष्टात येईल. त्यानंतर नवीन सहा पदरी पूल पुढील सहा महिन्यात बांधण्यात येणार आहे. तो बांधल्यानंतर महामार्गावरून फक्त थेट वाहतूक जाईल तर सेवा रस्त्यावरून पुणे येथील शहरांतर्गत वाहतूक मार्गस्थ होईल. हा प्रकल्प केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने हाती घेण्यात आला असून त्यासाठी 400 कोटी रुपये खर्च करण्यात येत आहेत.