चला पर्यटनाला…दाट जंगलात वेगळ्या पर्यटनाची अनुभूती देतोय ‘वाघझरा’

वाघझरा
वाघझरा

विशाळगड (कोल्हापूर) : सुभाष पाटील -रणरणत्या उन्हात मनुष्यासह पशु-पक्ष्यांचा जीव मेटाकुटीला आला आहे. नद्या, नाले, तलाव, धरण, पाणवठे आदींनी तळ गाठल्याने पाण्याची भीषण समस्या आहे. परिणामी जंगली प्राण्यांनी आपला मोर्चा नागरीवस्तीत वळविला आहे. मात्र विशाळगड मार्गावरील गर्द झाडीतील 'वाघझरा पाणवठा' ऐन उन्हाळ्यात जंगली प्राण्यांची तृष्णा भागवत असल्याने तो त्यांच्यासाठी वरदान ठरत आहे.

'वाघझरा' म्हणजे बारमाही पाण्याचा निर्मळ साठा. वन्यजीवाचे दर्शन हमखास घडवणारे ठिकाण. दिवस मावळला की, गव्यांचे कळप दिसू लागतात. बिबट्या दिसत नसला तरी बिबट्याच्या पावलांचे ठसे दिसतात. जंगलातल्या या वेगळ्या पर्यटनाची अनुभूती येथे मिळते. दाट झाडी, वेगवेगळ्या पक्ष्यांचा आवाज अगदी सुरात ऐकायला येऊ लागतो. वाघझऱ्याला 'वाघाचे पाणी'ही म्हणतात. पर्यटकांच्या जेवणाच्या 'रंगीत' पंगतीचेही ते ठिकाण आहे; पण क्षणभर ही दुरावस्था बाजूला ठेवून, या वाघझऱ्याचा परिसर पाहिला, की दाट जंगलात नैसर्गिक पाणवठे कसे असतात?, ते वन्यप्राण्याची तहान कशी भागवतात ? असे पाणवठे जंगलात आवश्‍यक का असतात ? याचे वास्तव दर्शन घडते. किंबहुना अशी ठिकाणेच जंगलाचे, वन्य प्राण्यांचे बळ असते.

जंगलाचे प्रतिबिंब, पक्ष्यांचा आवाज इथली शांतताही भीतीदायक वाटते. पण ज्याला जंगलातला खळाळणारा ओहोळ, नैसर्गिक पाण्याचा साठा, त्यात जंगलाचे पडणारे प्रतिबिंब पाहत, पशु-पक्ष्यांच्या अस्तित्वाचा आवाज ऐकायचा आहे त्यांनी वाघझरा पाहण्याचीच गरज आहे. या परिसरातले पर्यटन आंबा घाट, पावनखिंड, पांढरपाणी, विशाळगड जरूर आहे. पण या सर्वांच्यामध्ये दाट जंगलात दडलेले 'वाघझरा' हे वेगळ्या अर्थाने पर्यटनस्थळ आहे.

खूप वनवैभवाने हा परिसर वेढला आहे. जंगल पर्यटन, धार्मिक पर्यटन या दोन्ही अंगाने त्याचा विकास शक्य आहे. वाघझरा हे नैसर्गिक पाणवठ्याचे ठिकाण. रात्री या रस्त्यावरची वर्दळ कमी झाली की बिबट्या, गव्यापासून प्रत्येक वन्यप्राण्याचे 'पाय' तहान भागवण्याठी या वाघझऱ्याला लागतात. पाणवठ्याच्या एका बाजूला पर्यटकांच्या अस्तित्वाच्या बाटली, पत्रावळी, खाऊची पाकिटे, प्लास्टीक ग्लास, गुटख्याची पाकिटे या खुणा तर पाणवठ्याच्या दुसऱ्या बाजुस वन्यप्राण्यांच्या पायाच्या खुणा दिसतात. वाघझऱ्याचा पाणवठा वन्य प्राण्यांचा आधार आहे.

सन २००९ मध्ये तत्कालीन मलकापूर वनपरिक्षेत्र अधिकारी पी एम बागेवाडी यांच्या कल्पकतेतून वाघझरा येथे पाच लाख रुपये खर्चून विहीर, वनतळे, विश्रांती स्थळ आणि पक्षी निरीक्षणासाठी मनोरे, प्राण्यांची माहिती देणारे होर्डिंग्ज उभारण्यात आले. त्यानंतर येथे पर्यटकांची गर्दी वाढली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news