आज जोतिबा यात्रा; मानाच्या सासनकाठ्या दाखल : लाखो भाविक डोंगरावर

आज जोतिबा यात्रा; मानाच्या सासनकाठ्या दाखल : लाखो भाविक डोंगरावर

ल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या जोतिबाची चैत्र पौर्णिमा यात्रा बुधवारी (दि. 5) होत आहे. महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा, गुजरात, मध्य प्रदेशातून भाविक जोतिबाच्या दर्शनाला येतात. मानाच्या सासनकाठ्याही डोंगरावर दाखल झाल्या आहेत. बुधवारी पहाटेपासून धार्मिक विधी सुरू होणार आहेत. लाखो भाविकांच्या उपस्थितीत सायंकाळी 5.30 वाजता पालखी सोहळा सुरू होणार आहे.

चैत्र यात्रेसाठी दोन दिवसांपासून भाविक डोंगरावर येण्यास सुरुवात झाली आहे. बैलगाडी, ट्रॅक्टर ट्रॉली, ट्रक तसेच पायीदेखील भाविक दाखल झाले आहेत. बुधवारी पहाटे शासकीय अभिषेक, सासनकाठी पूजन होईल. यानंतर सायंकाळी देवाचा छबिना लवाजम्यासह यमाई देवीच्या भेटीसाठी बाहेर पडणार आहे.

दुपारी सासनकाठी मिरवणूक

बुधवारी पहाटे तीन वाजता महाघंटानाद, काकड आरती, पाद्यपूजा, मुखमार्जन हे विधी होतील. पहाटे पाच वाजता पन्हाळा तहसीलदार, देवस्थानचे व्यवस्थापक व श्री पुजारींच्या उपस्थितीत शासकीय महाभिषेक होईल. यानंतर देवाची राजदरबारी बैठी अलंकार महापूजा बांधली जाणार आहे. दुपारी 12 वाजता सासनकाठी मिरवणुकांना सुरुवात होईल. पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते मानाच्या सासनकाठीचे काळभैरव मंदिरासमोर पूजन होईल. सायंकाळी 5 वा. 30 मिनिटांनी तोफेची सलामी होऊन पालखीचे यमाई मंदिराकडे प्रस्थान होईल. रात्री आठ वाजता देवाची पालखी पुन्हा मंदिराकडे आल्यानंतर तोफेची सलामी दिली जाईल. यानंतर जोतिबा सदरेवर विराजमान होतील. रात्री 10 वाजता पालखी सोहळा पूर्ण होईल, अशी माहिती मंदिर व्यवस्थापक दीपक म्हेतर यांनी दिली.

भाविकांसाठी अन्नछत्र

पंचगंगा नदीघाटावर शिवाजी चौक तरुण मंडळ, गायमुख येथे सहजसेवा ट्रस्ट, मुख्य एस. टी. स्टँडजवळ आर. के. मेहता ट्रस्ट यांची मोफत अन्नछत्रे सुरू आहेत. तसेच पाटीदार समाज, पटेल समाज यांच्या वतीनेही ठिकठिकाणी भाविकांना पाणी, सरबत, नाष्टा दिला जात आहे.

वैद्यकीय उपचार

जिल्हा परिषद, व्हाईट आर्मी, डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल, भारती विद्यापीठ यांची वैद्यकीय पथके जोतिबा डोंगरावर भाविकांना वैद्यकीय सेवा देत आहेत.

दुचाकी पंक्चर सेवा

जिल्ह्यातील 200 हून अधिक दुचाकी मेकॅनिक, पंक्चर कारागीर जोतिबा डोंगर तसेच घाटामध्ये भाविकांची नादुरुस्त वाहने मोफत दुरुस्त करून पंक्चर काढून देणार आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news