केंद्राने सहकारी बँकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलावा : शरद पवार

केंद्राने सहकारी बँकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलावा : शरद पवार

पुणे, पुढारी वृत्तसेवा : देशातील बँकिंग क्षेत्रात ९२ टक्के घोटाळे हे खासगी आणि राष्ट्रीयकृत बँकांमध्ये झालेले आहेत. सहकारी बँकिंग क्षेत्रातील हे प्रमाण ०.४६ टक्क्यांइतके म्हणजे एक टक्कासुध्दा नाही. त्यामुळे केंद्र सरकारने सहकारी बँकांमध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळे होतात, हा गैरसमज दूर करून सहकारी बँकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलावा आणि त्यांना पाठबळ द्यावे, असे मत माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी व्यक्त केले.

दि. विश्वेश्वर सहकारी बँकेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाचा सांगता समारंभ गुरुवारी (दि.५) टिळक स्मारक मंदिरात झाला. त्यावेळी शरद पवार हे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या वेळी डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठाचे माजी कुलपती डॉ. गो. बं. देगलूरकर, बँकिंग तज्ज्ञ विद्याधर अनास्कर, खासदार श्रीनिवास पाटील, बँकेचे अध्यक्ष सुनील रुकारी, बँकेच्या सुवर्ण महोत्सवी समितीचे कार्याध्यक्ष अनिल गाडवे, उपाध्यक्ष अजय डोईजड, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीराम आपटे, गौरविकेचे संपादक विद्याधर ताठे, माजी आमदार उल्हास पवार, बापूसाहेब धनकवडे आदी उपस्थित होते. या वेळी बँकेच्या सुवर्ण महोत्सवीवर्षाचे औचित्य साधून 'विश्वार्थ' या गौरविकेचे प्रकाशन करण्यात आले. तसेच रिझर्व्ह बँकेने विश्वेश्वर बँकेच्या इंटरनेट बँकिंग सुविधेला दिलेल्या परवानगीनुसार या सेवेचे उद्घाटन पवार यांनी केले.

कोणत्याही बँकेच्या आर्थिक उलाढालीपेक्षा त्या बँकेची स्थिती चांगली की वाईट हे समजण्यासाठी नाडी परीक्षा म्हणून अनुत्पादक कर्जाचे प्रमाण (एनपीए) पाहिले जाते. दि विश्वेश्वर सहकारी बँकेचा एनपीए १.३४ टक्क्यांइतका कमी आहे. त्यामध्ये संचालक मंडळ, भागीदार, खातेदार व ग्राहकांचा महत्त्वाचा वाटा आहे, असे सांगून पवार यांनी विश्वेश्वर बँकेचे कौतुक केले. सहकारी बँकांकडून घेतलेले पैसे परत करण्याची सवय आणि शिस्त खातेदारांमध्ये अपेक्षित असते. देशातील बँकिंग क्षेत्राकडे पाहिल्यानंतर मात्र अस्वस्थता दिसते. केंद्र सरकारला राष्ट्रीयकृत बँकांमध्ये प्रचंड गुंतवणूक करावी लागली. ही गुंतवणूक झाली नसती, तर या बँकांचे आरोग्य बिघडले असते, असेही ते म्हणाले. खा. श्रीनिवास पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. अनिल गाडवे यांनी स्वागत केले. सुनील रुकारी यांनी प्रास्ताविक केले. प्रकाश पायगुडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

हेही वाचंलत का?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news