‘मंकीपॉक्स’ वर नजर ठेवण्यासाठी केंद्राकडून टास्क फोर्सची स्थापना

‘मंकीपॉक्स’ वर नजर ठेवण्यासाठी केंद्राकडून टास्क फोर्सची स्थापना

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : देशात मंकीपॉक्स रोगाच्या रुग्णांची संख्या वाढत चालल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने यावर लक्ष ठेवण्यासाठी टास्क फोर्सची स्थापना केली आहे. नीती आयोगाचे सदस्य (आरोग्य) डॉ. व्ही. के. पॉल यांच्या नेतृत्वाखाली हे टास्क फोर्स काम करणार आहे.

टास्क फोर्समध्ये आरोग्य मंत्रालय, औषध आणि बायोटेक खात्याच्या सचिवांचा समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली. देशात आतापर्यंत दिल्ली, केरळ आणि तामिळनाडू या ठिकाणी मंकीपॉक्सचे रुग्ण सापडलेले आहेत. रुग्णांची संख्या वाढत चालल्यानंतर केंद्र सरकारने सर्व राज्यांसाठी अलर्ट जारी केला होता. विशेषतः विदेशातून येणाऱ्या लोकांत मंकीपॉक्स आढळत असल्याने विमानतळ तसेच बंदरावर आरोग्य विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना तैनात करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

मंकीपॉक्सच्या फैलावावर लक्ष ठेवण्याबरोबरच याच्या नियंत्रणासाठी राज्य सरकारांना योग्य ते मार्गदर्शन करण्याची जबाबदारी टास्क फोर्सकडे देण्यात आली आहे. मंकीपॉक्सच्या निदानासाठी ठिकठिकाणी लॅबची सुविधा करणे व त्यावर लस उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करण्याचे कामही पॅनेलकडे असेल. संयुक्त अरब अमिरातीमधून केरळमध्ये परतलेल्या एकाचा मृत्यू झाला होता. त्याला मंकीपॉक्स झाल्याचे तपासणीत दिसून आले होते. देशातला मंकीपॉक्सचा हा पहिला मृत्यू आहे. जगात सर्वप्रथम १९५८ साली मंकीपॉक्स आढळला होता. माकडांमध्ये हा रोग होत असल्याने त्याला मंकीपॉक्स म्हटले जाते. जगभरात हा रोग वेगाने पसरत आहे. व जागतिक आरोग्य संघटनेने यासंदर्भात हेल्थ इमरजन्सीची घोषणा केलेली आहे.

हेही वाचलंत का ? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news