सीडीएस जनरल बिपीन रावत मरणोत्तर पद्म विभूषण पुरस्काराने सन्मानित

पद्म विभूषण पुरस्काराने सन्मानित www.pudhari.news
पद्म विभूषण पुरस्काराने सन्मानित www.pudhari.news

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : देशाचे पहिले सीडीएस जनरल बिपीन रावत यांना सोमवारी मरणोत्तर पद्म विभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांच्या कन्या कृतिका तसेच तारिणी यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारला. ८ डिसेंबर २०२१ रोजी सीडीएस रावत यांचा तामिळनाडू येथील हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू झाला होता.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राष्ट्रपती भवनात नागरी सन्मान समारंभ-१ दरम्यान वर्ष २०२२ साठीचे दोन पद्मविभूषण,आठ पद्मभूषण आणि ५४ पद्मश्री पुरस्कार प्रदान केले. समारंभात राधे श्याम आणि जनरल बिपिन रावत (मरणोत्तर) यांना पद्मविभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. तर, काँग्रेस चे जेष्ठ नेते गुलाम नबी आझाद, गुरमीत बावा (मरणोत्तर), एन. चंद्रशेखरन, पेरालंपिक रजत पदक विजेते देवेंद्र झाझरिया, राशीद खान, राजीव महर्षी, सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया चे एमडी डॉ.सायरस पूनावाला आणि सच्चिदानंद स्वामी यांना पद्मभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आले. नागरी सन्मान समारंभ-२ २८ मार्च रोजी होणार आहे.

पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री या तीन श्रेणींमध्ये हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. कला, सामाजिक कार्य, सार्वजनिक घडामोडी, विज्ञान आणि अभियांत्रिकी, व्यापार आणि उद्योग, औषध, साहित्य आणि शिक्षण, क्रीडा, नागरी सेवा इत्यादी विविध शाखा,कार्यक्षेत्रात हे पुरस्कार देण्यात आले. 'पद्मविभूषण' हा पुरस्कार उल्लेखनीय आणि अतुलनीय सेवेसाठी दिला जातो. उच्च श्रेणीतील अतुलनीय सेवेसाठी 'पद्मभूषण' आणि कोणत्याही क्षेत्रातील अतुलनीय सेवेसाठी 'पद्मश्री' पुरस्काराने गौरवण्यात येते. दरवर्षी प्रजासत्ताक दिनी या पुरस्कारांची घोषणा केली जाते.

राष्ट्रपती भवनात आयोजित समारंभात राष्ट्रपतींच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. या वर्षी एकूण १२८ पद्म पुरस्कार प्रदान करण्यात येतील, यात दोन पुरस्कार विभागून दिले जाणार आहेत. यंदाच्या पुरस्कार विजेत्यांच्या यादीत चार पद्मविभूषण, १७ पद्मभूषण आणि १०७ पद्मश्री पुरस्कारांचा समावेश असून यापैकी ३४ महिला आहेत. या यादीमध्ये परदेशी,एनआरआय, पीआयओ, ओसीआय या श्रेणीतील १० व्यक्ती आहेत आणि १३ जणांना मरणोत्तर पुरस्कार देण्यात येईल.

हेही वाचलतं का?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news