नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : पश्चिम बंगालमध्ये दुसऱ्या टप्प्याचे मतदान सुरु असतानाच तृणमूल काँग्रेसचा स्थानिक नेता, शाहजहाँ शेखने महिलांचे लैंगिक शोषण करून त्यांच्या जमिनी हडपल्यावरून देशभरात चर्चेत असलेल्या संदेशखाली येथे शुक्रवारी सीबीआयने टाकलेल्या धाडीत विदेशी बंदुकांसह शस्त्रास्त्र साठा जप्त करण्यात आला. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि तृणमूल काँग्रेसच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे.
संदेशखाली येथे मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा दडवून ठेवण्यात आल्याची गोपनीय माहिती सीबीआयला प्राप्त झाली होती. त्यानुसार, एका ठिकाणी टाकण्यात आलेल्या धाडीत विदेशी बनावटीच्या बंदुका आणि इतर शस्त्रास्त्रांचा साठा जप्त करण्यात आला. सीबीआयच्या या कारवाईमुळे लोकसभा निवडणुकीत सुरु असलेल्या प्रचारात भाजपने सत्ताधारी तृणमूल काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे.बेकायदेशीर कारवायांसाठी संदेशखाली आता अतिशय गंभीर वळणावर आले आहे. तृणमूल काँग्रेसचा स्थानिक नेता शाहजहाँ शेखने केलेले महिलांवरील अत्याचार आणि त्यांच्या जमिनी हडपण्याच्या प्रकारामुळे बदनाम झालेल्या संदेशखाली येथे अंमली पदार्थांचे रॅकेट उघडकीस आले होते. आता त्यात अवैध शस्त्रास्त्रांची भर पडली असल्याची प्रतिक्रिया पश्चिम बंगाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुकांत मजुमदार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.
कोलकातापासून अगदी १०० किलोमीटर अंतरावर असलेल्या सुंदरबन या सीमावर्ती जिल्ह्यातील संदेशखाली या गावात गेल्या एक वर्षापासून हिंसाचार आणि अवैध कारवाया सुरु आहेत. तृणमूल काँग्रेसचा स्थानिक नेता शाहजहाँ शेखने आमच्यावर अत्याचार करून जमिनी हडपल्याचा आरोप काही महिलांनी केला होता. त्याविरोधात संदेशखाली येथे तीव्र आंदोलन करण्यात आले होते. शाहजहाँ शेखने रेशन घोटाळा केल्याचाही आरोप आहे.या घोटाळ्यात ईडीचे पथक त्याच्या घरी चौकशीसाठी गेले असताना, त्याने या पथकावर हल्ला चढविला होता. शाहजहाँ शेखला ममता बॅनर्जी यांचे पाठबळ असल्याचा आरोप करून भाजपने निवडणूक प्रचारात तृणमूल काँग्रेसविरुद्ध राळ उडवली आहे. मतदानाचा दुसरा टप्पा सुरु असतानाच संदेशखाली येथे शस्त्रास्त्र साठा जप्त झाल्याने, भाजपच्या हाती आयते कोलीत मिळाले आहे.
हेही वाचा :