अल्प रक्तदाबाची कारणे, लक्षणे आणि त्यावरील उपाय

अल्प रक्तदाबाची कारणे, लक्षणे आणि त्यावरील उपाय
Published on
Updated on

एखाद्या व्यक्तीचा मानसिक ताणामुळे अनेकदा रक्तदाब कमीही होतो. रक्तदाब प्रमाणाबाहेर वाढणे किंवा प्रमाणाबाहेर कमी होणे हे दोन्ही आरोग्यासाठी घातक आहे. अल्प रक्तदाब हा विकार हायपो-टेन्शन, लो ब्लड प्रेशर, लो बीपी या नावांनीही ओळखला जातो.

आजची धकाधकीची जीवनशैली लहान वयातच अनेक व्याधी घेऊन येते. ऑफिस कामाचे अधिक तास, व्यायामाचा अभाव, आहारात अनियमितता या सर्व कारणांमुळे पूर्वीच्या काळी जे आजार वृद्धापकाळी जडायचे, किंबहुना जे आजार वृद्धापकाळातील आजार म्हणून ओळखले जायचे ते तिशीच्या आसपासच आपल्याला जडू लागले आहेत.

जास्तीत जास्त पैसा कमावण्याच्या, स्पर्धेत टिकून राहण्याच्या नादात आपण अनेक अनावश्यक ताण आपल्यावर लादून घेत असतो. त्यामुळे आपले मानसिक संतुलन बिघडते आणि त्याचा परिणाम अपरिहार्यपणे शरीरावर होतो. अलीकडे झालेल्या विविध पाहण्यांमध्ये ऐन तिशीत मधुमेह, हृदयविकार तसेच उच्च रक्तदाब जडलेल्या लोकांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचे दिसून आले आहे. जागतिक आरोग्य संघटनेनेही अशा विकारांच्या वाढत्या प्रमाणावर चिंता व्यक्त केली आहे.

एखाद्या व्यक्तीचा मानसिक ताणामुळे रक्तदाब वाढतो हे आपल्याला माहीत आहे; पण अनेकदा रक्तदाब कमीही होतो. रक्तदाब प्रमाणाबाहेर वाढणे किंवा प्रमाणाबाहेर कमी होणे हे दोन्ही आरोग्यासाठी घातक आहे. उच्च रक्तदाबाबाबत आपण काळजी घेतो. कारण, आपल्याला त्याची लक्षणे माहीत असतात; पण रक्तदाब कमी होण्याकडे आपण फारसे लक्ष देत नाही.

याविषयी आपल्याला फारशी माहितीही नसते; पण अनेक जणांना लो ब्लड प्रेशरचा त्रास असतो. अल्प रक्तदाब हा विकार हायपो-टेन्शन, लो ब्लड प्रेशर, लो बीपी या नावांनीही ओळखला जातो. या विकारात रक्तदाब असामान्यपणे कमी होतो. प्रौढांमध्ये सिस्टेलिक ब्लड प्रेशर 100 मि.मी. एचजीपेक्षा कमी आढळले तर त्यांना अल्प रक्तदाबाचे रुग्ण मानले जाते.

अल्प रक्तदाबाची कारणे

* रक्तदाब असामान्यपणे कमी होण्यामागे अनेक कारणे असू शकतात.
* उच्च रक्तदाब किंवा डिप्रेशनसाठी घेतल्या जाणार्‍या औषधांमुळे रक्तदाब कमी होऊ शकतो.
* हृदयातील विकृतीमुळे अल्प रक्तदाब होऊ शकतो.
* अतिसार, उलटीमुळे डिहायड्रेशनची स्थिती निर्माण झाल्याने.
* शरीराचे तापमान असामान्यपणे कमी झाल्यामुळे
* रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाल्याने, दमा, न्यूमोनिया यांसारख्या विकारांमध्ये रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते.
* हार्मोन्सच्या असंतुलनामुळे रक्तदाब कमी होऊ शकतो.
* मज्जासंस्थेच्या विकारामुळे रक्तदाब कमी होऊ शकतो. जसे डायबेटिक न्यूरोपॅनी, मेंदू आणि मज्जासंस्थेस इजा झाल्याने रक्तदाब असामान्यपणे कमी झालेला आढळतो.
* कुपोषणामुळे
* किडन्यांच्या विकारामुळे
* शारीरिक दुर्बलता, अशक्तपणामुळे
* उपवास, अन्न आणि पाण्याच्या कमतरतेमुळे
* शारीरिक अतिश्रमामुळे
* मानसिक तणाव, भय, शोक, मानसिक आघातामुळे अल्प रक्तदाबाची स्थिती निर्माण होते.

अल्प रक्तदाबाची लक्षणे

* अत्याधिक घाम येणे
* बेचैन, अस्वस्थ वाटणे
* चक्कर येणे
* हातपाय थंड पडणे, कंपण होणे, थरथरणे,
* डोळ्यांसमोर अंधारी येणे, दृष्टी कमजोर होणे
* हृदयाची स्पंदने असामान्यपणे वाढणे

ही लक्षणे सामान्यत: अल्प रक्तदाबात उत्पन्न होऊ शकतात.
रुग्णाचा इतिहास, वैद्यकीय तपासणीद्वारे अल्प रक्तदाबाचे निदान केले जाते. रक्तदाबमापक यंत्राने रक्तदाब तपासला जातो. त्यातून अल्प रक्तदाबाचे निदान केले जाते. काही वेळा ईसीजी परीक्षण करणेही अत्यावश्यक असते.

प्रतिबंधात्मक उपाय

शरीरात पाण्याची कमतरता किंवा डिहायड्रेशन उद्भवू नये यासाठी पाणी भरपूर प्या. तसेच अतिसार, उलट्या असा त्रास होत असेल तर ताबडतोब डॉक्टरकडे जाऊन उपचार करून घ्यावेत. डॉक्टरांच्या सूचनेशिवाय उच्च रक्तदाबावरील औषधे परस्पर घेऊ नयेत. अल्प रक्तदाबाच्या समस्येवर वेळीच योग्य उपचार करणे आवश्यक असते. उपचारांत दिरंगाई केल्यास अनेक गंभीर समस्या उद्भवतात. हृदय, किडनी, डोळे निकामी होऊ शकतात. पक्षाघात होऊ शकतो.

अल्प रक्तदाब तीव्र झाल्यास मृत्यूही ओढवतो. म्हणूनच प्रत्येकाने ठराविक कालावधीनंतर आपला रक्तदाब तपासून घेणे आवश्यक आहे. आजकालचे आपले आयुष्य अतिशय गुंतागुंतीचे आणि अनेक ताणतणाव असलेले बनले आहे. बेसुमार यांत्रिकीकरणामुळे निसर्गाच्या सान्निध्याला आपण पारखे होत चाललो आहोत. साधे फिरायला जाण्यासाठीही आपल्या अवतीभवती निवांत जागा नसते.

मन शांत राहील, तणावमुक्त होईल असे वातावरण नसते. अशा वेळी चिडचिड होणे, कुणाचा तरी राग घरातील व्यक्तींवर निघणे, मनावरचा ताबा सुटणे असे प्रकार घडतात. ते आपल्या आरोग्यासाठी घातक असते. पूर्वीच्या काळी लोकांचे जीवन कमी गुंतागुंतीचे होते. एकत्र कुटुंब असल्याने कुटुंबातील कामे वाटून घेतली जात असत.

सगळा भार एकाच व्यक्तीवर पडत नसे; पण आता तसे होत नाही. पती-पत्नी आणि एक किंवा दोन मुले अशा त्रिकोणी किंवा चौकोनी कुटुंबात असंख्य कामे असतात; पण ती करण्यासाठी पती-पत्नी आणि मुले यापैकी कुणालाच वेळ नसतो. पत्नीही नोकरी, व्यवसाय करणारी असते. तिलाही घर आणि नोकरी किंवा व्यवसाय सांभाळताना कसरत करावी लागते. पतीला तर घरातील सदस्यांकडे पाहायला देखील वेळ नसतो.

अशा परिस्थितीत अशा व्याधी जडल्या नाही तरच नवल असते. संपन्न जीवन म्हणजे केवळ पैशाने श्रीमंत नव्हे. सर्व सोयीसुविधा आपण पैशाने विकत घेऊ शकतो; पण मन:शांती आणि समाधान मिळवणे हे आपल्याच हातात असते. ते मिळाले तर अनेक व्याधी आपल्यापासून दूरच राहतात. तणावमुक्त जीवन, नियमित व्यायाम आणि संतुलित आहार यावर भर दिला तर उच्च किंवा अल्प रक्तदाबासारख्या व्याधींपासून आपण अनेक कोस दूर राहू.

डॉ. महेश बरामदे

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news