Jawaharlal Nehru University
Jawaharlal Nehru University

Jawaharlal Nehru University: जेएनयूच्या भिंतीवर ब्राह्मणविरोधी धमक्या लिहिल्याप्रकरणी गुन्हा दाखल

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा: देशातील नामांकित जवाहरलाल नेहरु विद्यापीठात (जेएनयू) अज्ञातांकडून लिहिण्यात आलेल्या जातीवाचक टिप्पणीमुळे पुन्हा एकदा वादंग निर्माण झाले आहे. विद्यापीठातील स्कूल ऑफ इंटरनॅशनल स्टडीजच्या भिंतीवर लिहिण्यात आलेल्या या धमक्यांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचे वकील विनीत जिंदाल यांनी दिल्ली पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. दिल्ली पोलिसांनी या प्रकरणी अज्ञातांविरुद्ध आयपीसीच्या कलम १५३ ए/बी, ५०५, ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

ब्राह्मणविरोधी धमक्या लिहिल्याप्रकरणाची दखल घेत कुलगुरू प्राध्यापक शांतिश्री धुलिपुडी यांनी देखील चौकशीचे आदेश दिले होते. विभागातील शिक्षक कक्ष तसेच भिंतीवर ब्राह्मणविरोधी लिखाणाचे प्रकरण समाज माध्यमांवरही चर्चेचा ठरतो आहे. यानंतर या प्रकरणातील अज्ञातांवर गुन्हा दाखल झाला आहे.

कुलगुरूंनी घेतली गंभीर दखल

या प्रकरणात एका शिक्षकाच्या खोलीसमोर 'गो बॅक शाखा' असे लिहण्यात आले आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने (एबीव्हीपी) याप्रकरणी डाव्या संघटनांवर आरोप केले आहे. दरम्यान या घटनेची निंदा करीत अशा घटनांचे समर्थन केले जाणार नाही. जेएनयू सर्वांचे आहे, असे विद्यापीठ प्रशासनाने स्पष्ट केले आहे. कुलगुरूंनी या प्रकरणात लवकरात लवकर अहवाल सादर करण्याचे निर्देश विभाग प्रमुखांना दिले आहेत. समावेश तसेच समानतेवर जेएनयूचा विश्वास आहे. जेएनयू मध्ये कोणत्याही प्रकारच्या हिंसेवर शून्य सहनशीलता धोरण अवलंबण्याचे निर्देश देखील कुलगुरूंनी दिले आहे.

logo
Pudhari News
pudhari.news