बुलढाणा, पुढारी वृत्तसेवा: समृद्धी महामार्गावर देऊळगाव कोळ शिवारात आज (दि. २९) पहाटे साडेचारच्या सुमारास एका भरधाव कारने कठड्याला धडकून पेट घेतला. या भीषण अपघातात कारमधील दोन जणांचा होरपळून जागीच मृत्यू झाला. तर एक जण कारमधून बाहेर फेकला गेला. त्याचा उपचारादरम्यान दुसरबीड येथील रूग्णालयात मृत्यू झाला. अजय दिनेश बिलाल ( रा. मध्य प्रदेश) असे त्याचे नाव आहे.
लोणार तालुक्यातील बिबी पोलिस ठाणे हद्दीत देऊळगाव कोळ नजीक हा अपघात झाला. भरधाव कार (एमएच ०२ सीआर १४५९) ही नागपूरहून शिर्डीकडे जात होती. मृतदेह जळालेले असल्याने मृतांची ओळख पटवणे अवघड झाले होते.
याबाबत अधिक माहिती अशी की, समृद्धी महामार्गावर देऊळगाव कोळनजीक एक भरधाव कार सिमेंट रेलिंगच्या डिव्हायडरला धडकली. या कारमध्ये डिझेलचे काही डब्बे होते. अपघातानंतर कारने पेट घेतला. कारमध्ये तीन प्रवासी होते, त्यापैकी एक जण बाहेर फेकला गेला. तर दोघे होरपळून ठार झाले. तिसर्या जखमीला तातडीने दुसरबीड व नंतर मेहकर येथील ग्रामीण रूग्णालयात हलविले. मात्र, त्याचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या कारमध्ये डिझेलने भरलेल्या पाच ते सहा कॅन होत्या. त्यामुळे कारने पेट घेताच डिझेलचा भडका उडाला.यात कारमधील दोघांचा जागीच होरपळून तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अपघात इतका भीषण होता की समृद्धी महामार्गावरील वाहतूक काही वेळ थांबविण्यात आली होती. मृतदेह मेहकर येथील ग्रामीण रुग्णालयात ठेवण्यात आले आहेत. या घटनेचा अधिक तपास महामार्ग पोलीस करत आहेत.
महामार्ग पोलीस एपीआय अरुण बकाल, बिबिचे ठाणेदार सोनकांबळे, पीएसआय राजू गायकी, कलीम देशमुख, अरुण सानप यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.
हेही वाचा