कोल्हापूर, दिलीप भिसे : कधीकाळी वरिष्ठ अधिकारीच काय, सुरक्षारक्षकांच्याही डोळ्याला डोळा लावण्याची मुंबई-पुण्यातल्या कोण्या नामचीन गँगस्टर्सची बिशाद नसलेल्या मध्यवर्ती कळंबा कारागृहात सद्य:स्थितीत सुरक्षा यंत्रणेचा अक्षरश: खेळखंडोबा सुरू आहे. कडेकोट तटबंदी अन् भक्कम सुरक्षा यंत्रणेचा दावा करणार्या कळंबा जेलमध्ये खुद्द सुभेदारानेच गांजाची तस्करी करावी… हा किती धक्कादायक अन् लाजिरवाणा प्रकार. कैद्यांना गांजा पुरविण्याचा प्रयत्न करणारा जेलचा सुभेदारच रंगेहाथ जेरबंद झाल्याने कळंब्याच्या लौकिक आणि विश्वासार्हतेला काळिमा फासण्याचा प्रकार घडला आहे. कारागृहाच्या भक्कम तटबंदीही आता भ्रष्टाचाराने बरबटू लागल्या आहेत की काय, असा प्रश्न सामान्यांतून व्यक्त होऊ लागला आहे.
'शुक्राचार्यां'कडून यंत्रणा कुचकामी!
पश्चिम महाराष्ट्रासह कोकण, मराठवाडा, विदर्भ आणि कर्नाटक, गोव्यासह अन्य राज्यातील कुख्यात टोळ्यांतील नामचीन गुंड, शिवाय देश-विदेशातील कैदीही मध्यवर्ती कळंबा कारागृहात बंदिस्त आहेत. 'मोका' अंतर्गत कारवाई झालेल्या, अत्यंत घातक समजल्या टोळ्यांमधील साडेतीनशेवर गुंड कोठडीत बंदिस्त असतानाही झारीत दडलेल्या शुक्राचार्यांकडून बंदिस्त कारागृहाची सुरक्षा यंत्रणाच कुचकामी करण्याचा प्रयत्न होत असल्याचे गांजा प्रकरणावरून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.
कळंबा कारागृहाच्या प्रशासनाची लक्तरे वेशीवर
कळंबा कारागृहाचा सुभेदार बाळासाहेब गेंड याला कैद्याला गांजा पुरवठा करण्याच्या प्रयत्नात जुना राजवाडा पोलिसांनी नुकतीच अटक केली. शिवाय घरझडतीत अडीच किलो गांजा आणि 50 हजाराची रोकडही तपास यंत्रणेच्या हाताला लागली आहे. कारागृहातील सुरक्षारक्षकानेच सुभेदाराच्या कृत्याचा भांडाफोड केल्याने कळंबा कारागृह प्रशासनाची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत.
गांजा पुरवठा : वाटेकरी कोण कोण?
गांजा पुरवठाप्रकरणी कारागृह सुभेदाराचे सेवेतून तत्काळ निलंबन झाले असले तरी या मिळकतीच्या धंद्यातील त्याचे वाटेकरी कोण कोण आहेत, याचा शोध घेऊन तपास यंत्रणांनी संबंधितांच्या मुसक्या आवळण्याची आवश्यकता आहे. केवळ 'तपास सुरू आहे…' असे सांगून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न होऊ नये, अशी कोल्हापूरकरांची अपेक्षा आहे.
गांजा तस्करी : तपशीलवार माहिती उघड होण्याची गरज!
सुभेदाराने गांजा आणला कोठून, त्यात मध्यस्थी कोणाची, कोणाच्या शेतात पिकवला, सुभेदाराच्या घरापर्यंत कोणी पोहोचविला, घरात सापडलेली रक्कम कोणाची याची तपशीलवार माहिती जनतेसमोर येण्याची आवश्यकता आहे. कळंबा कारागृहात गांजा तस्करीसह मोबाईल, सिमकार्ड पुरवठा प्रकरणी दोन-अडीच वर्षांत दोन डझनहून गुन्हे राजवाडा पोलिस ठाण्यात दाखल झाले आहेत. तपास अधिकार्यांनी कारागृहातील किती अधिकार्यांसह रक्षकांना जबाबदार धरून कायद्याचा बडगा उगारला, हा संशोधनाचा विषय आहे.
गांजा कनेक्शनचा लवकरच पर्दाफाश होणार : पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित
कळंबा कारागृहातील मोबाईल, सिमकार्ड पुरवठा, गांजासह अमलीसद़ृश वस्तूंच्या तस्करीवर पोलिस यंत्रणेची करडी नजर होती. पोलिस अधिकार्यांनाही सक्त सूचना देण्यात आल्या होत्या. बंदिस्त कारागृहात गांजा पुरवठा करणार्या जेलच्या सुभेदाराविरुद्ध गुन्हा दाखल होताच तपासाधिकार्यांना सखोल चौकशीचे आदेश देत संशयिताच्या घराची तत्काळ झडतीच्या सूचना करण्यात आल्या आणि हा अंदाज खरा ठरला. सुभेदाराच्या घरझडतीत अडीच किलो गांजा, 50 हजाराची रोकड आढळून आली. सुभेदाराकडे गांजा आला कोठून, त्याचे कनेक्शन काय, या सार्या घटनाक्रमांचा पोलिस यंत्रणेमार्फत लवकरच पर्दाफाश होईल, असे पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी दै. 'पुढारी'शी बोलताना सांगितले.