कोल्हापूर, प्रवीण मस्के : सीए अर्थात चार्टर्ड अकौंटंट ही सर्वात अवघड परीक्षा समजली जाते. परंतु, यंदाच्या निकालात कोल्हापुरातून 52 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. गेल्या वर्षाच्या तुलनेत निकालाचा टक्का वाढला असून विद्यार्थ्यांचा वाणिज्य विभागाकडे कल वाढल्याचे दिसून येत आहे.
सीए करिअरचा एक उत्तम पर्याय मानला जातो. सीए परीक्षेचे चित्र बदलले असून, मोठ्या संख्येने या क्षेत्राकडे विद्यार्थी आकर्षित होत आहेत. अमेरिकेसारख्या मोठ्या देशात सीए मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. त्यानंतर भारताचा नंबर लागतो. सीएचे काम फक्त टॅक्स रिटर्न्स भरणे एवढ्यापुरते मर्यादित राहिलेले नाही. सध्याच्या वाढत्या आधुनिकीकरण, औद्योगिकीकरणाच्या युगात सीए विविध प्रकारची कामे करतात. व्यावसायिक भाषेत सीएला फायनान्शियल डॉक्टर म्हटले जाते. व्यवसायाच्या द़ृष्टीने सीए महत्त्वाचा घटक समजला जातो. व्यवसायातील नफा-तोटा, व्यवसायावर अप्रत्यक्षपणे नजर ठेवण्याचे जबाबदारीचे काम ते करतात. इन्कम टॅक्स, व्हॅट, सर्व्हिस टॅक्स व एलबीटी आदी करांसंबंधीची महत्त्वाची कामे सीए यांना करावी लागतात.
सीएची वर्षातून दोनवेळा परीक्षा होते. सध्या नवीन अभ्यासक्रमानुसार परीक्षा होत आहे. त्यातच देशपातळीवरील सीए अभ्यासक्रम शिकविणारे ऑनलाईन क्लासेस, तज्ज्ञांचे मार्गदर्शन कोल्हापुरात उपलब्ध होत आहे.
विद्यार्थ्यांकडून टेस्ट सिरीज सोडविल्या जात आहेत. प्रॅक्टिस मोठ्या प्रमाणात केली जात आहे. परिणामी, गेल्या वर्षीच्या 33 च्या तुलनेत यंदा 52 सीए कोल्हापूर जिल्ह्यातून झाले आहेत. सध्या भारतात मोठ्या प्रमाणात परकीय कंपन्या गुंतवणूक करीत आहेत. त्यामुळे या कंपन्यांना सीएची गरज भासत आहे.
नव्याने येणारे बीपीओ, केपीओ यांच्यासाठी सल्लागार म्हणून सीए आवश्यक असतात. यासह नवीन खासगी बँका व फायनान्स कंपन्यादेखील हुशार सीएच्या शोधात असतात. त्यामुळे देशात कितीही सीए निर्माण झाले, तरी मोठ्या प्रमाणात मागणी कायमच राहणार आहे.