उसाचे पाचट जाळणे म्हणजे किडनीच्या आजारांना आमंत्रण; अमेरिकेतील कोलोरॅडो विद्यापीठाच्या अभ्यासातील निष्कर्ष

उसाचे पाचट जाळणे म्हणजे किडनीच्या आजारांना आमंत्रण; अमेरिकेतील कोलोरॅडो विद्यापीठाच्या अभ्यासातील निष्कर्ष

वॉशिंग्टन; वृत्तसंस्था : शेतात उसाचे पाचट आणि भाताचे पिंजर जाळणे म्हणजे भारत, अमेरिका, श्रीलंका यांसह अन्य अनेक देशांतील कृषी कामगारांसाठी धोक्याची घंटा असल्याचे शास्त्रीय संशोधनानुसार स्पष्ट झाले आहे. यातून निर्माण होणार्‍या धुरातील विषारी घटक किडनीला मारक ठरतात. कासावीस करायला लावणार्‍या या धुरामुळे श्वास घेण्यातही अडचणी येतात.

अमेरिकेतील कोलोरॅडो विद्यापाठीने यावर अभ्यास केला आहे. त्याचे निष्कर्ष 'अ‍ॅनल्स ऑफ वर्क एक्सपोजर अँड हेल्थ जर्नल'मध्ये प्रसिद्ध झाले आहेत. शेतात जेव्हा पाचट किंवा पिंजर जाळले जाते, तेव्हा त्यातून वातावरणात धूर पसरतो. मात्र जेथे ही ज्वलनाची प्रक्रिया पार पाडली जाते, तेथील कामगारांना यातून भविष्यात अनेक आजारांचा सामना करावा लागू शकतो. प्रामुख्याने विकसनशील देशांमध्ये उसाचे पाचट किंवा भाताचे पिंजर जाळल्याने कृषी कामगारांच्या किडनीला मार बसतो. प्राथमिक विश्लेषणावरून असे दिसून आले आहे की, उसाच्या पाचटामध्ये आकारहीन वालुकामय पदार्थांचे प्रमाण अधिक असते. याला शास्त्रीय परिभाषेत अ‍ॅमोर्फस सिलिका असे संबोधले जाते. पाचट जाळल्यानंतर बाहेर पडणारे विषारी पदार्थ श्वास घेण्यात अडथळे निर्माण करतात.

नैसर्गिक यंत्रणेत आणतात व्यत्यय

धुरातून बाहेर पडणारे विषारी पदार्थ फुफ्फुसात प्रवेश केल्यावर शरीराच्या नैसर्गिक यंत्रणेत व्यत्यय आणतात. यामुळे श्वास घेताना त्रास होणे किंवा दम लागणे ही लक्षणे दिसू लागतात. त्याकडे वेळीच लक्ष दिले नाही तर त्यातून फुफ्फुसालाही धोका निर्माण होऊ शकतो. तसेच शरीरात दाह निर्माण होतो. एवढेच नव्हे तर किडनी म्हणजेच मूत्रपिंडालाही धुरातील विषारी पदार्थांमुळे फटका बसू शकतो.

भारतात प्रमाण मोठे

उसाचे पाचट आणि भाताचे पिंजर जाळण्याचे प्रमाण भारतातही प्रचंड आहे. हरियाणा, पंजाबसारख्या राज्यांत तर जेव्हा शेतातील तण जाळले जाते तेव्हा राजधानी दिल्लीला धुरांच्या ढगांनी विळखा घातलेला असतो. या तणाला उत्तरेकडील राज्यांत पराली असे संबोधले जाते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news