पुणे : राज्यात यंदा हरभर्‍याचे बंपर उत्पादन; 29 लाख हेक्टरवर उच्चांकी पेरणी

पुणे : राज्यात यंदा हरभर्‍याचे बंपर उत्पादन; 29 लाख हेक्टरवर उच्चांकी पेरणी
Published on
Updated on

किशोर बरकाले

पुणे : राज्यात सद्यस्थितीत 29 लाख 20 हजार 56 हेक्टर क्षेत्रावर हरभरा पेरणी झाली असून, आजवरचे सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. त्यामुळे उच्चांकी असे 36 लाख टनांहून अधिक हरभर्‍याचे बंपर उत्पादन हाती येण्याचा कृषी विभागाचा प्राथमिक अंदाज आहे. यामुळे हरभरा साठवणुकीची समस्याही निर्माण होऊ शकते. त्यामुळे किमान आधारभूत किंमतीने हरभर्‍याची खरेदी केंद्रे वेळेत सुरू करण्याची आवश्यकता असून, तसे न झाल्यास कांद्यानंतर हरभर्‍याच्या दरात घसरणीची शक्यता आहे.

राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पाणी उपलब्धता अधिक आहे. पाऊस दीर्घकाळ लांबल्याने ज्वारीचा पेरा अपेक्षेपेक्षा घटला आहे. त्यामुळे गहू आणि हरभरा पेरणी वाढण्याचा अंदाज रब्बी हंगामाच्या सुरुवातीपासूनच वर्तविण्यात येत होता. ऊस पीक निघाल्यानंतरही हरभरा पेरणीस प्राधान्य देण्यात आले आहे. राज्यातील हरभर्‍याचे सरासरी क्षेत्र 21 लाख 58 हजार 270 हेक्टरइतके आहे. त्यामुळे हरभर्‍याची 29.20 लाख हेक्टरवरील पेरणीचा विचार पाहता सरासरी क्षेत्रापेक्षा सुमारे 135 टक्क्यांवर हरभर्‍याची पेरणी झाली आहे.

राज्यात गतवर्षी हरभर्‍याची पेरणी आणि उत्पादनाचा नवा उच्चांक चालू वर्षात मोडला असून, बंपर उत्पादन अपेक्षित आहे. त्यामध्ये गतवर्ष 2021-22 मध्ये 23.72 लाख हेक्टर क्षेत्राइतका असलेला हरभर्‍याचा पेरा चालू वर्ष 2022-23 मध्ये सुमारे साडेपाच लाख हेक्टरने वाढून 29.20 लाख हेक्टर इतक्या उच्चांकी पातळीवर पोहोचला आहे.

तर गतवर्षी 27.15 लाख टन इतका हरभरा उत्पादनाचा उच्चांक चालू वर्षी मोडीत निघून सुमारे नऊ लाख टनांहून अधिक म्हणजे तब्बल 36.40 लाख टनांवर हरभर्‍याचे उत्पादन पोहोचण्याचा कृषी विभागाचा प्राथमिक अंदाज आहे. जे मागील पाच वर्षांच्या तुलनेत तिपटीने वाढण्याची अपेक्षा असल्याचेही सांगण्यात आले.

अपेक्षित 36 लाख टन हरभरा उत्पादन आणि राज्य वखार महामंडळांच्या गोदामांमधील साठवणुकीतील 5.72 लाख टन शिलकी साठा पाहता सुमारे 42 लाख टन हरभर्‍याची उपलब्धता होण्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. त्या तुलनेत हरभर्‍याचा खप आणि विक्रीचे गणित कसे वाढवायचे याची जबाबदारी मार्केटिंग विभागावर असल्याने कांद्यापाठोपाठ आता हरभर्‍याबाबतही खरी अग्निपरीक्षा सुरू होणार असल्याचे बोलले जाते.

राज्यातील मागील 5 वर्षांतील हरभरा पिकाखालील क्षेत्र (लाख हेक्टर) आणि उत्पादन (लाख टनात)
वर्ष क्षेत्र उत्पादन
2018-19 16,94,249 13,96,969
2019-20 20,43,208 22,40,089
2020-21 22,31,282 23,97,210
2021-22 23,72,180 27,15,129
2022-23 29,20,056 36,39,078

"राज्यात खरिपात सोयाबीन आणि रब्बी हंगामात हरभरा पेरणीचा उच्चांक झालेला आहे. कमी पाण्यावर येणारे हमखास पीक असल्याने शेतकर्‍यांचा कल यंदाही हरभरा लागवडीकडे वाढला. त्यामुळेच उच्चांकी 29.20 लाख हेक्टर क्षेत्रावर हरभरा पेरणी होऊन उच्चांकी 36 लाख टन इतके उत्पादन राज्यात तयार होण्याची अपेक्षा आहे. शिवाय हरभर्‍याची हेक्टरी उत्पादकता 10 ते 11 क्विंटलवरून वाढून चालू वर्षी सुमारे 12 ते 13 क्विंटलइतकी मिळेल. त्यामुळे उत्पादनात वाढ होणार हे स्पष्ट झाले आहे.

          – विनयकुमार आवटे, मुख्य सांख्यिक, कृषी आयुक्तालय, पुणे.

"महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोदामांमध्ये सद्यस्थितीत 20 हजार 922 वखार पावत्यांवर सुमारे 5 लाख 72 हजार 866 टन हरभर्‍याची साठवणूक करण्यात आलेली आहे. याव्यतिरिक्त तूर, मूग, उडीद, आयात उडदाची मिळून कडधान्यांची 19 हजार 434 टनाइतकी साठवणूक गोदांमामध्ये आहे. एकूण 5 लाख 92 हजार 300 टन कडधान्ये साठवणुकीत महामंडळाच्या स्वमालकीच्या गोदामात 3 लाख 1 हजार 433 टन आणि महामंडळाने घेतलेल्या भाड्याच्या गोदामात 2 लाख 90 हजार 867 टन इतका साठा ठेवण्यात आला आहे.

        – दीपक तावरे, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, वखार महामंडळ, पुणे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news