बैल आणि बैलगाडी शर्यतींचा थरारक इतिहास!

बैल आणि बैलगाडी शर्यतींचा थरारक इतिहास!
Published on
Updated on

कोल्हापूर; विशेष प्रतिनिधी :  इसवी सनपूर्व 3,500 वर्षांपूर्वी स्पेनमधून प्रथम आशिया खंडात आणि त्यानंतर भारतात बैलाचे आगमन झाल्याचे दाखले इतिहासात मिळतात. सुरुवातीच्या काळात म्हणजे हजारो वर्षांपासून बैलांचा वापर हा प्रामुख्याने शेती कामासाठीच केला जात होता. मात्र, जसजशी मानवी संस्कृती विकसित होत गेली, तसतसा शर्यतीसारख्या मनोरंजनाच्या कामीही बैलांचा वापर होऊ लागला. महाराष्ट्राला बैलगाडी शर्यतींचा जवळपास 400 वर्षांचा इतिहास आहे. स्थानपरत्वे या शर्यतींचे स्वरूप भिन्नभिन्न असून, नावेही वेगवेगळी असल्याचे दिसून येते.

पुणे जिल्ह्यात दीर्घ परंपरा : पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यांत बैलगाडी शर्यतींची 400 वर्षांची परंपरा आहे. इथल्या शर्यतींचे वैशिष्ट्य म्हणजे इथल्या शर्यतीतील बैलांना हाकायला कुणीही नसते. बैल स्वत:च जिद्दीने पल्ला गाठताना दिसतात. घोड्यावर बसलेला गाडीमालक बैलगाडीच्या पुढे पळून त्यांना केवळ वाट दाखवत असतो. एकावेळी एक किंवा दोनच बैलगाड्या सोडल्या जातात. कमीत कमी वेळेत निर्धारित अंतर पार करणार्‍या बैलजोडीला विजेते घोषित केले जाते.

छकडा शर्यत (पश्चिम महाराष्ट्र) : पश्चिम महाराष्ट्राला बैलगाडी शर्यतींची 300 वर्षांची परंपरा आहे. या खेळामध्ये 5-25 बैलगाड्या एकाचवेळी सोडल्या जातात. निर्धारित अंतर जी बैलजोडी लवकर पार करेल, ती विजेती ठरते. या प्रकारच्या शर्यतीत बैल हाकण्यासाठी खास गाडीवान असतात.

शंकरपट (विदर्भ) : विदर्भात बैलगाडी शर्यतींना 'शंकरपट' म्हटले जाते. तिथेही या खेळाची सुमारे 300 वर्षांची परंपरा आहे. या खेळामध्ये एका वेळेस एक किंवा दोन बैलगाड्या सहभागी असतात. यामध्ये गाडीवर बसलेला चालक हा गाडी चालवत असतो. जी बैलजोडी सर्वात कमी वेळेत निर्धारित अंतर पार पाडेल. त्यांना प्रथम क्रमांक दिला जातो. विदर्भातील उमरखेड, अमरावती, यवतमाळ, वर्धा, बुलडाणा भागांत हा खेळ चालतो. शंकरपटामध्ये चालकाला बसायला वेगळी जागा असते.

शेम्बी गोंडा (बैल-घोडा) : नाशिक, अहमदनगर, राहुरी, सिन्नर या भागांत घोडा आणि बैल यांची स्पर्धा होते. या खेळामध्ये गाडीला बैल व घोडा जुंपला जातो. या स्पर्धेमध्ये गाडीवर चालक बसलेला असतो. एका वेळेस फक्त 2 गाड्या या स्पर्धेमध्ये सोडल्या जातात. जी गाडी सर्वांत प्रथम येईल, त्यांना क्रमांक दिला जातो. या शर्यतीच्या प्रकारामध्ये स्पर्धकाला दोन वेळा स्पर्धा खेळावी लागते. पहिल्या फेरीत एक बैल आतून पळतो आणि दुसर्‍या फेरीला दुसरा बैल बाहेरून पळवला जातो. यामध्ये दोन्ही फेर्‍यांच्या वेळेस घोडा मात्र एकच असतो.

चिखलगुट्टा : कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा, गारगोटी, पन्हाळा, शाहूवाडी, गगनबावडा, राधानगरी या तालुक्यांमध्ये ऑगस्ट महिन्यात चिखलगुट्टा शर्यती खेळविल्या जातात. या खेळामध्ये बैलांना पळण्यासाठी 500 फूट लांबीचा चरी मारलेला एक मातीचा ट्रॅक बनवला जातो. गुट्टा हा लाकडापासून बनवलेला असतो. बैलांना या खेळामध्ये कमीत कमी वेळेत 500 फूट अंतर पूर्ण करावे लागते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news