नगर : पैशासाठीच घातल्या होलेंना गोळ्या

file photo
file photo
Published on
Updated on

नगर; पुढारी वृत्तसेवा : केडगाव बाह्यवळण रस्त्यावर नेप्ती शिवारात रस्ताच्या कडेला बसलेल्या शिवाजी होले यांचा पिस्तुलातून गोळ्या घालून केल्याच्या गुन्ह्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी तिघांना जेरबंद केले. केवळ पैशासाठीच शिवाजी होले यांना गोळ्या घातल्याचे तपासात निष्पन्न झाले. याच आरोपींनी साकूर (ता. संगमनेर) येथील पेट्रोलपंपावर दरोडा घातला. तर, लक्ष्मी टायरचे दुकाने फोडल्याचे उघडकीस आले. सर्व आरोपी राहुरी व नेवासा तालुक्यातील आहेत.

अजय भाऊसाहेब चव्हाण (वय 25, रा. वळणपिंप्री, ता. राहुरी), सागर वसंत जाधव (वय 26 रा. वळणपिंप्री), राजेंद्र भाऊसाहेब शिंदे (वय 27, रा. खेडले परमानंद ता. नेवासा) असे आरोपींची नावे आहेत. अधिक माहिती अशी, 23 फेब्रुवारी रोजी रात्री अरुण नाथा शिंदे त्यांच्या मित्रासोबत केडगाव बाह्यवळण रस्त्यावरील हॉटेल के 9 समोर दारू पित बसलेले होते. अनोळखी तीन इसम हातात चाकू व पिस्टल घेऊन आले. त्यांनी अरुण शिंदे यांच्या गळ्याला चाकू लावत पैसे काढून द्या, असे म्हणाला.

त्यावेळी शिंदे यांचा मित्र पळू लागला. त्यावेळी आरोपीने मित्र शिवाजी किसन होले यांच्यावर पिस्तुलातून गोळीबार केला. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्याचवेळी शिंदे यांच्या डोळ्यात मिरचीपूड टाकून रोख रक्कम व मोबाईल फोन असा सहा हजारांचा
मुद्देमाल बळजबरीने चोरू नेला. याबाबत कोतवाली पोलिस ठाण्यात खून व जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला.

या गुन्ह्याचा तपास सुरू असतानाच 26 फेब्रुवारी रोजी घारगाव शिवारात रात्रीच्या वेळी अनोळखी व्यक्तींनी नाशिक-पुणे रस्त्यावरील लक्ष्मी टायर पंक्चरचे दुकाने फोडले. दुकान मालकाला चाकूचा धाक दाखवून दुकानासमोरील दुचाकी, मोबाईल व रोख रक्कम असा 34 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. त्याच टोळीने साकूर ते मांडवे रस्त्यावरील भगवान पेट्रोलपंपावर काम करणार्‍या कर्मचार्‍यांना चाकू व गावठी पिस्तुलाचा धाक दाखवून पंपावरील 2 लाख 50 हजार 747 रुपये बळजबरीने चोरून नेले. याबाबत घारगाव पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते.

पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने गुन्ह्याच्या तपासाकामी स्वतंत्र पथकाची नेमणूक केली होती. पोलिसांनी रस्त्यावरील हॉटेल, ढाब्यांवरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरूवात केली. याचवेळी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके यांना माहिती मिळाली की, नेप्तीचा खून, पेट्रोल पंपावरील दरोडा, टायरचे दुकान लुटणारी एकाच टोळी असून, अजय चव्हाण याने साथीदारांसह गुन्हा केला आहे.

तो सध्या वळणपिंप्री येथे गावी आला आहे, अशी माहिती मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी सापळा लावून अजय चव्हाण याला वळणपिंप्री येथून ताब्यात घेतले. त्याच्याकडे खुनाच्या गुन्ह्याबाबात विचारपूस केली असता तो उडाउडवीची उत्तरे देऊ लागला. त्याला आणखी विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने खुनाच्या गुन्ह्याची कबुली दिली. तसेच पेट्रोलपंप (साकूर) येथील दरोडा व टायरचे दुकान लुटल्याची कबुली दिली. आरोपी चव्हाण याने अन्य साथीदारांची नावे सांगितली. त्यानुसार पोलिस पथकाने त्याच्या साथीदारांना विविध ठिकाणावरून अटक केली. पुढील तपासाकामी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आरोपींना कोतवाली पोलिसांच्या ताब्यात दिले.

पिस्तुल घेतला वाळू तस्कराकडून
मृत शिवाजी होले यांच्यावर गोळ्या झाडल्या. तो पिस्तुल सहा वर्षांपासून आरोपीने जिल्ह्यातील एका वाळू तस्कराकडून विकत घेतला होता. पुढे त्या वाळू तस्कराचाही खून झाला. पण आरोपीकडे ते पिस्तुल कायम राहिले. तेच पिस्तुलातून त्याने होले यांच्यावर गोळ्या झाडल्याची माहिती पोलिस सूत्रांकडून मिळाली.

यांच्या पथकाने केली कारवाई
ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस उपनिरीक्षक सोपान गोरे, पोलिस हेडकॉन्स्टेबल मनोहर गोसावी, दत्तात्रेय गव्हाणे, संदीप घोडके, पोलिस नाईक ज्ञानेश्वर शिंदे, शंकर चौधरी, विशाल दळवी, रविकुमार सोनटक्के, दीपक शिंदे, पोलिस कॉन्स्टेबल सागर ससाणे, रोहित येमुल, रणजित जाधव, मयूर गायकवाड, मेघराज कोल्हे, लक्ष्मण खोकले, महिला पोलिस नाईक भाग्यश्री भिटे, चालक पोलिस उमाकांत गावडे, संभाजी कोतकर, भरत बुधवंत यांच्या पथकाने केली.

आरोपी अजय चव्हाण सराईत
आरोपी अजय भाऊसाहेब चव्हाण हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुध्द अहमदनगर, पुणे व औरंगाबाद जिल्ह्यात जबरी चोरी, चोरी व सरकारी कामामध्ये अडथळा निर्माण करणे अशा स्वरूपाचे 11 गंभीर गुन्हे दाखल आहेत. हिंजवडी, कामशेत, देहुरोड, निगडी, लोणीकंद, शिक्रापूर (जि. पुणे), श्रीगोंदा, राहुरी, नगर (जि. अहमदनगर), गंगापूर (जि. औरंगाबाद) आदी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news