पुढारी ऑनलाईन डेस्क : Budget Session 2024 : संसदेच्या मागील हिवाळी अधिवेशनात निलंबित करण्यात आलेल्या सर्व विरोधी पक्षांच्या खासदारांचे निलंबन रद्द करण्यात येणार असून हे सर्व खासदार उद्या 31 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सहभागी होऊ शकणार आहेत. अधिवेशनापूर्वी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीनंतर संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात 140 हून अधिक विरोधी खासदारांना संसदेतून निलंबित करण्यात आले होते.
विरोधी पक्षाच्या खासदारांचे निलंबन मागे घेण्याची विनंती सरकारने लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभेच्या सभापतींना केल्याचे जोशी यांनी सांगितले. काही विरोधी खासदारांचे निलंबन हिवाळी अधिवेशनापर्यंतच होते, मात्र काहींचे प्रकरण विशेषाधिकार समितीकडे पाठवण्यात आल्याचे ते म्हणाले. ते म्हणाले की, विशेषाधिकार समितीशी बोलल्यानंतर विरोधी खासदारांचे निलंबन रद्द करण्याची विनंती करण्यात आली, ज्याला लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभा सभापतींनी सहमती दर्शवली.
संसदेच्या सुरक्षेतील त्रुटींबाबत केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या विधानाची मागणी करत गोंधळ घातल्याप्रकरणी एकूण 146 विरोधी खासदारांना संसदेतून निलंबित करण्यात आले. यामध्ये लोकसभेतील 100 आणि राज्यसभेतील 46 खासदारांचा समावेश होता. निलंबित खासदारांपैकी 132 खासदारांना हिवाळी अधिवेशनासाठी निलंबित करण्यात आले असून अधिवेशन संपताच त्यांचे निलंबन संपुष्टात आले. 14 खासदारांचे प्रकरण विशेषाधिकार समितीकडे पाठवण्यात आले होते.
सर्वप्रथम 14 डिसेंबरला विरोधी पक्षाच्या 14 खासदारांना निलंबित करण्यात आले. यानंतर 18 डिसेंबरला विक्रमी 78 विरोधी खासदारांना निलंबित करण्यात आले. 19 डिसेंबर रोजी 49 खासदारांना लोकसभेतून निलंबित करण्यात आले, तर 20 डिसेंबर रोजी 2 आणि 21 डिसेंबर रोजी 3 खासदारांना लोकसभेतून निलंबित करण्यात आले. त्यातील बहुतांश खासदार हे काँग्रेसशी संबंधित होते. या खासदारांच्या अनुपस्थितीत सरकारने नवीन फौजदारी कायद्यांसह अनेक महत्त्वाची विधेयके मंजूर केली होती.
13 डिसेंबर रोजी संसदेच्या शून्य प्रहरात सागर शर्मा आणि मनोरंजन डी या दोन व्यक्तींनी प्रेक्षक गॅलरीतून लोकसभेच्या सभागृहात उडी मारली आणि सभापतींकडे जाऊ लागले. खासदारांनी त्यांना थांबवल्यानंतर त्यांनी स्मोक कँडल फोडल्या, त्यामुळे संपूर्ण सभागृहात धुराचे लोट पसरले. त्याचवेळी, नीलम आणि अमोल शिंदे नावाच्या दोन आरोपींनी संसद भवनाबाहेर धुराचे लोट पसरवले. या घटनेतील चौघांनीही सुरक्षा दलांनी अटक केली आहे.