Budget 2022 : लोकाभिमुख, शानदार अर्थसंकल्प : पंतप्रधान

Budget 2022 : लोकाभिमुख, शानदार अर्थसंकल्प : पंतप्रधान
Published on
Updated on

नवी दिल्‍ली ; पुढारी वृत्तसेवा : हा अर्थसंकल्प सर्वसामान्य माणसासाठी अनेक संधी उपलब्ध करून देणारा लोकाभिमुख, शानदार अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरचित्रवाणीवरून देशाला उद्देशून केलेल्या भाषणातून व्यक्‍त केली. अधिक पायाभूत सुविधा, विकास आणि विविध शक्यतांनी भरलेला हा अर्थसंकल्प असल्याचे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले, या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून 'ग्रीन जॉब्स'चे नवे क्षेत्र खुले झाले आहे. यामुळे देशातील युवा वर्गाचे भविष्य उज्ज्वल होईल. या बजेटचे प्रत्येक क्षेत्रातून स्वागत झाले आहे आणि जनतेकडून सकारात्मक प्रतिक्रिया आली आहे. त्यामुळे जनतेची सेवा करण्याचा उत्साहही वाढला आहे.

वंदे भारत ट्रेन, डिजिटल करन्सी, शेतकर्‍यांसाठी ड्रोन, नॅशनल हेल्थसाठी डिजिटल इको-सिस्टीमसारख्या घोषणांमुळे लोकांना मोठाच लाभ होईल. हा गरिबांचे कल्याण करणारा अर्थसंकल्प आहे. प्रत्येक गरिबाला पक्के घर मिळावे, प्रत्येक घरात नळाने पाणी यावे, शौचालय असावे आणि स्वयंपाकाच्या गॅसची सुविधा असावी हे सर्व पाहून हा अर्थसंकल्प बनवण्यात आला आहे. त्याबरोबरच आधुनिक इंटरनेट कनेक्टिव्हिटीवरही जोर देण्यात आला आहे.

हिमालयाच्या संपूर्ण क्षेत्रातील जीवन सुकर बनवण्यासाठी आणि तेथून होणारे स्थलांतर रोखण्यासाठी नव्या घोषणा करण्यात आल्या आहेत. हिमाचल आणि जम्मू-काश्मीरसारख्या क्षेत्रांना नजरेसमोर ठेवून 'पर्वतमाला योजना' सुरू करण्यात आली आहे. यामुळे या डोंगराळ भागात ट्रान्स्पोर्ट आणि कनेक्टिव्हिटी वाढेल.

यामुळे सीमावर्ती गावांना अधिक ताकद मिळेल. गंगेच्या स्वच्छतेबरोबरच शेतकर्‍यांच्या कल्याणासाठी उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, पश्‍चिम बंगाल, झारखंडसारख्या राज्यांमध्ये गंगेकाठी नैसर्गिक शेतीला उत्तेजन दिले जाईल. त्यामुळे गंगेला रसायनमुक्‍त करण्यासाठी मदत होईल. या अर्थसंकल्पामुळे शेती लाभदायक होईल आणि विशेष संधी उपलब्ध होतील. त्यामुळे शेतकर्‍यांचे उत्पन्‍न वाढण्यास मदत मिळेल.

'एमएसपी'च्या माध्यमातून शेतकर्‍यांच्या खात्यांमध्ये सव्वा दोन लाख कोटींपेक्षाही अधिक रक्‍कम हस्तांतरित केली जात आहे. 'एमएसएमई'ची मदत आणि सुरक्षेसाठी अनेक निर्णय घेण्यात आले होते. आता या बजेटद्वारे 'एमएसएमई'साठी अनेक योजनांच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. हे एक 'पीपल फ्रेंडली बजेट' असल्याचे सांगून पंतप्रधानांनी त्यासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन केले.

अर्थसंकल्पाचा सर्व वर्गांना फायदा

अर्थसंकल्पामधून सर्व वर्गांना फायदा होईल, शेतकर्‍यांच्या हिताकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे. या अर्थसंकल्पामुळे रोजगाराच्या संधी निर्माण होतील. तसेच गरिबांचा उद्धार करण्यावरदेखील भर देण्यात आला आहे.
– नरेंद्र मोदी, पंतप्रधान

हे तर झीरो बजेट!

मोदी सरकारने सादर केलेला अर्थसंकल्प हा 'शून्य' आहे. या झीरो बजेटमधून जनेतच्या पदरी काहीच आले नाही. बजेटमध्ये नोकरदारवर्ग, मध्यमवर्गीय, गरीब, वंचित, युवा तसेच शेतकर्‍यांसाठी काहीच नाही.
– राहुल गांधी, काँग्रेस नेता

दिशा हरवलेला अर्थसंकल्प

बेरोजगारी, महागाई आणि कमी होत चाललेले उत्पन्‍न, यामुळे सर्वसामान्यांच्या मनात प्रचंड अस्वस्थता आहे. अर्थसंकल्पातून काही ठोस उत्तरे मिळतील, अशी अपेक्षा होती; मात्र ही अस्वस्थता सरकारपर्यंत पोहोचलेलीच दिसत नाही. त्यामुळे हा अर्थसंकल्प सर्वसामान्यांच्या अपेक्षांचा भंग करणारा, उद्दिष्टपूर्तीची दिशा हरवलेला अर्थसंकल्प आहे.
– उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

हे पेगासस, स्पिन बजेट

हे पेगासस, स्पिन बजेट आहे. या बजेटमध्ये बेरोजगारी, महागाईचा फटका बसलेल्या सामान्य नागरिकांसाठी काहीच नाही.
– ममता बॅनर्जी,
मुख्यमंत्री, पश्‍चिम बंगाल

कॉमन मॅनचे बजेट

हा अर्थसंकल्प कॉमन मॅनसाठी आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी चालू वर्षात भारताची आर्थिक वाढ 9.2 टक्के राहण्याचा अंदाज व्यक्‍त केला आहे. पीएम गती शक्‍ती मिशन, सर्वसमावेशक विकास, उत्पादकतेत वाढ आणि आर्थिक गुंतवणूक हे अर्थसंकल्पातील चार फोकस पॉईंटस् होते.
– डॉ. भागवत कराड, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री

जनतेचा अपेक्षाभंग

'लॉलीपॉप बजेट' सादर करत सर्वसामान्य जनतेचा अपेक्षाभंग केला आहे. क्रिप्टो करन्सी आता देशात कायदेशीर असेल ही घोषणा 'आरबीआय'ऐवजी अर्थमंत्र्यांनी केली. हे देशातील श्रीमंत लोकांच्या सांगण्यावरून करण्यात आले आहे.
– पी. चिदम्बरम, माजी अर्थमंत्री

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news