जम्मू- काश्मीर : पाकिस्तानने पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करत बीएसएफ जवानांवर गोळीबार केला. दरम्यान, या गोळीबाराला जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले. बीएसएफने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तान रेंजर्सनी आज सकाळी जम्मू- काश्मीरमधील अर्निया सेक्टरमध्ये गस्त घालणाऱ्या बीएसएफ जवानांवर गोळीबार केला. त्याला जम्मूच्या बीएसएफ तुकडीने चोख प्रत्युत्तर दिले. यात बीएसएफचे कसलेही नुकसान झालेले नाही.
पाकिस्तानकडून आज पहाटे शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. त्यांनी गस्त घालणाऱ्या जवानांवर गोळीबार केला. पाकिस्तानी रेंजर्सनी केलेल्या या बेछूट गोळीबाराला बीएसएफ जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले, अशी माहिती बीएसएफचे डीआयजी एसपीएस संधू यांनी दिली.
याआधी २५ ऑगस्ट रोजी पाकिस्तानच्या एका घुसखोराने भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी बीएसएफने तस्करीचा मोठा कट हाणून पाडला होता. सांबा जिल्ह्यातील सीमेवर एका पाकिस्तानी घुसखोरांकडून ८ किलो हेरॉईन जप्त केले होते. यादरम्यान घुसखोराला गोळीदेखील लागली होती.
याआधी २७ ऑगस्ट रोजी बीएसएफने सीमेजवळ एका पाकिस्तानी घुसखोराला अटक केली होती. मोहम्मद शबद असे त्याचे नाव असून तो सियालकोट येथील रहिवासी आहे. तो सीमेपलीकडून अर्निया सेक्टरमध्ये घुसखोरी करत होता. या दरम्यान त्याला ताब्यात घेण्यात आले होते.