पुढारी ऑनलाईन डेस्क
शेअर बाजारावर रशिया-युक्रेन युद्धाचं सावट कायम आहे. यामुळे शेअर बाजाराचा सेन्सेक्स (Sensex) आज शुक्रवारी पुन्हा एकदा घसरला. आज शुक्रवारी सकाळच्या सत्रात सेन्सेक्स तब्बल १,१०० अंकांनी घसरला. यामुळे सेन्सेक्स ५३,९०० अंकांवर येऊन व्यवहार करत आहे. तर निफ्टी (Nifty) १६,२०० अंकांच्या खाली येऊन व्यवहार करत आहे.
युक्रेनमधील युरोपातील सर्वात मोठ्या अणुऊर्जा प्रकल्पावर रशियन सैनिकांनी हल्ला केला आहे. याचे जगभरातील बाजारांत पडसाद उमटले. यूएस इंडेक्स फ्युचर्स आणि आशियाई बाजारांमध्ये मोठी घसरण झाली आहे. देशांतर्गत शेअर बाजारही कोसळला. एशियन पेंट्सच्या शेअर्समध्ये ५.२३ टक्क्यांची घसण झाली. मारुती सुझुकीचे शेअर्स ३ टक्क्यांनी घसरले. विप्रो, अॅक्सिस बँक शेअर्स प्रत्येकी २ टक्क्यांनी घसरले.
रशिया-युक्रेन युद्ध आणि क्रूड तेलाच्या वाढत्या किमतीमुळे आर्थिक परिस्थिती आणि बाजारातील वातावरण पूर्णपणे बदलले आहे. युद्ध लांबले तर जागतिक अर्थव्यवस्थेवर त्याचा मोठा परिणाम होऊ शकतो, अशी भिती बाजार विश्लेषकांनी व्यक्त केली आहे.