Milind Deora : मिलिंद देवरांकडून काँग्रेसला सोडचिठ्ठी; सर्व पदांचा राजीनाम

देवरांच्या पक्षांतराची औपचारिकता
देवरांच्या पक्षांतराची औपचारिकता
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : अनेक वर्षांपासून गांधी कुटुंबीयांशी एकनिष्ठ राहिलेले मुरली देवरा यांचे पुत्र, काँग्रेसचे दक्षिण मुंबईतील माजी खासदार तथा माजी केंद्रीय राज्यमंत्री मिलिंद देवरा यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटात ते रीतसर प्रवेश करणार आहेत. पक्ष प्रवेशाचे सोपस्कर पूर्ण झाल्यानंतर त्यांना केंद्रीय मंत्रिपद देण्यात येणार असल्याचे समजते. देवरा यांच्या सोडचिठ्ठीमुळे निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला जबरदस्त हादरा बसला आहे.

मिलिंद देवरांचे ट्विट

मिलिंद देवरा यांनी काँग्रेसच्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. त्यांनी आज एक्स पोस्ट करून याबाबत माहिती दिली. "आज माझ्या राजकीय प्रवासातील एका महत्त्वाच्या अध्यायाचा समारोप होत आहे. काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा मी राजीनामा दिला आहे. काँग्रेस पक्षाशी माझ्या कुटुंबाचे ५५ वर्षांचे नाते संपवत आहे. मी सर्व नेते, सहकारी आणि कार्यकर्ता यांचा वर्षानुवर्षे अखंड पाठिंबा दिल्याबद्दल त्यांचा आभारी आहे." असे त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.

गेल्या काही दिवसांपासून देवरा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते प्रफुल पटेल यांच्या संपर्कात होते. यावरून ते राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असल्याची अटकळ बांधण्यात येत होती. मात्र, राजकीय चित्र पाहून देवरा यांनी शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला. पक्षप्रवेशाबाबत ते मागील तीन दिवसांपासून आपल्या समर्थकांशी चर्चा करत होते. गरवारे क्लब आणि मुंबई काँग्रेस कार्यालयात शुक्रवारी काँग्रेस पदाधिकार्‍यांच्या बैठका होत्या. या दोन्ही बैठकांकडे देवरा यांनी पाठ फिरवल्याचे दिसून आले. बैठकीला उपस्थित राहण्याबाबत अनेक नेत्यांनी त्यांच्याशी संपर्क साधला, विनंतीही केली होती. मात्र, त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नव्हता.

मिलिंद यांचे वडील दिवंगत मुरली देवरा हे अनेक वर्षे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष होते. यास्तव मुंबईत त्यांच्या समर्थकांची संख्या अधिक आहे. देवरा यांनी पक्षीय सीमोल्लंघन करावे, यासाठी एका वजनदार उद्योगपतीने त्यांची मनधरणी केली होती. शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर देवरा यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान दिले जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news