धक्कादायक ! जारमधून मिळतंय बोअरिंगचं घाणेरडं पाणी; नागरिकांच्या जिवाशी खेळ

धक्कादायक ! जारमधून मिळतंय बोअरिंगचं घाणेरडं पाणी; नागरिकांच्या जिवाशी खेळ

नितीन शेळके

आळेफाटा : डॉक्टरांकडून शुद्ध पाणी वापराचा सल्ला दिला जातो. त्यामुळे घाबरून ग्रामीण भागात शुध्द पाण्याचे जार घरी मागविण्यास सुरुवात केली. मग काय? या परिस्थितीचा गैरफायदा उचलून बोगस मिनरल वॉटरच्या उद्योगाला उधाणच येणार नाही तर काय? होय, गेली कित्येक वर्षे आळेफाटा आणि परिसरातील गावोगावी मिनरल वॉटरच्या नावाखाली विनापरवाना दूषित पाणी पुरवणारी टोळी सक्रिय झाली आहे.

बोअर, विहिरीतील घाणेरडे पाणी उपसायचे अन् थंड करून हेच मिनरल वॉटरच्या जारमधून विकायचे, असा सारा खटाटोप सर्रासपणे सुरू आहे. त्यातच ग्रामीण भागात यात्रा-जत्रांचा हंगाम जोरात सुरू असून, यामुळे गावोगावी जारची मागणी वाढली आहे. आळेफाट्यासह जुन्नर पूर्व भागात 25 हून अधिक मिनरल वॉटर प्लांट थाटले आहेत. यातील नोंदणीकृत प्लांटची संख्या फार कमी आहे.

20 लिटर पाण्याच्या जारची किंमत 20 ते 30 रुपये आकारली जाते. मात्र, यातून मिळणारे पाणी किती शुद्ध आहे, याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागले आहे. उपचारांसाठी हॉस्पिटलमध्ये जाणार्‍या रुग्णांना डॉक्टरांकडून दूषित पाण्यामुळे डेंग्यू, स्वाईन फ्लू, चिकुनगुनिया, कावीळ असे आजार उद्भवत असल्याचे सांगण्यात येते. आरोग्याच्या भीतीने अनेकांचा ओढा साहजिकच मिनरल वॉटरकडे मोठ्या प्रमाणात वळू लागला आहे. नेमका याचाच लाभ उठवत अनेकांनी मिनरल वॉटरचे प्लांट उभारले. काहींनी नियमानुसार नोंदी करून व्यवसाय सुरू केला. मात्र, ही संख्या नगण्य आहे. (पूर्वार्ध)

टीडीएस 30 ते 90 दरम्यान असावा
धरणातून पिण्यासाठी उपलब्ध होणाऱ्या पाण्याचा टीडीएस 1000 ते 1200 पर्यंत असतो, तर अन्य पाण्याचा टीडीएस सरासरी 500 ते 800 च्या दरम्यान आहे. त्यामुळे हे पाणी आरोग्यासाठी अपायकारक ठरते. वास्तविक, शुद्धीकरण करताना तो 30 ते 90 च्या दरम्यान खाली आणला जातो, तरच ते पाणी पिण्यायोग्य मानले जाते, अशी माहिती या व्यवसायातील एकाने दिली.

पाण्याचे नमुने तपासून घेणे बंधनकारक
सरकारी नियमानुसार मिनरल वॉटरचा व्यवसाय करणाऱ्या मंडळींनी वेळोवेळी शासनाने प्रमाणित केलेल्या एनएबीएल यांच्याकडूनच पाण्याचे नमुने तपासून घेतले पाहिजेत. त्याशिवाय पाण्याची विक्री करणे कायद्याने गुन्हा मानला जातो. अनेक मंडळी खासगी लॅबमधून पाण्याची तपासणी करतात. जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेत जारच्या पाण्याबद्दलचे नमुने तपासणीसाठी येणारे प्रमाण फार कमी असते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news